कोल्हापूर : पहिल्या दिवशी टेंबलाईवाडी मार्केट सामसूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 05:10 PM2019-01-09T17:10:48+5:302019-01-09T17:13:59+5:30
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे टेंबलाईवाडी धान्य उपबाजाराचे व्यापाऱ्यांनी उद्घाटन केले; पण अद्याप विक्री मात्र लक्ष्मीपुरीतूनच सुरू आहे. पहिल्या दिवशी उपबाजार सामसूमच राहिला. एक-दोन दुकानांतच मालाची ने-आण सुरू राहिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे टेंबलाईवाडी धान्य उपबाजाराचे व्यापाऱ्यांनी उद्घाटन केले; पण अद्याप विक्री मात्र लक्ष्मीपुरीतूनच सुरू आहे. पहिल्या दिवशी उपबाजार सामसूमच राहिला. एक-दोन दुकानांतच मालाची ने-आण सुरू राहिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला उपबाजाराचा प्रश्न बाजार समिती व पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नाने मार्गी लागला. समिती प्रशासन व व्यापारी यांच्यातील विसंवादातून मंगळवारी उपबाजाराच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झाली. व्यापाºयांनी समिती प्रशासनाला अंगावर घेत मंगळवारी मोठ्या थाटात उद्घाटनही केले.
उद्घाटनानंतर किमान वीस व्यापाºयांचा व्यवहार तिथेच सुरू होईल, अशी अपेक्षा होती; पण बुधवारी उपबाजार परिसर सामसूम दिसत होता. कोणत्याही प्रकारच्या मालाची देवाणघेवाण अथवा विक्री दिसत नव्हती. बुधवारी दिवसभर नेहमीप्रमाणे लक्ष्मीपुरी व शाहूपुरीतच विक्री सुरू राहिली. एक-दोन दुकानांत मालाची ने-आण सुरू राहिली होती.
आता नेत्यांच्या हस्ते उद्घाटन
नेत्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम दोन-तीन दिवस पुढे ढकलण्याबाबत समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना विनंती केली होती; पण व्यापाऱ्यांचा मुहूर्तावरच तिथे जाण्याचा आग्रह राहिला. आता समिती प्रशासनाच्या वतीने येत्या आठ दिवसांत नेतेमंडळींच्या हस्ते उपबाजाराचे उद्घाटन केले जाणार आहे.