कोल्हापूर : दहावीचा गुरुवारी पहिला पेपर, दीड लाख परीक्षार्थी; भरारी पथकांची राहणार नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 04:37 PM2018-02-28T16:37:49+5:302018-02-28T16:37:49+5:30
शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला गुरुवारी मराठीच्या पहिल्या पेपरने सुरूवात होणार आहे. यावर्षी कोल्हापूर विभागात यावर्षी नियमित आणि पुर्नपरीक्षार्थी असे एकूण १ लाख ५० हजार ३७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.
कोल्हापूर : शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला गुरुवारी मराठीच्या पहिल्या पेपरने सुरूवात होणार आहे. यावर्षी कोल्हापूर विभागात यावर्षी नियमित आणि पुर्नपरीक्षार्थी असे एकूण १ लाख ५० हजार ३७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.
पहिल्या पेपरच्या तयारीसाठी बुधवारी विद्यार्थी अभ्यासात गुंतले होते. काहींनी परीक्षा केंद्रांवर जावून आपला क्रमांक त्याच ठिकाणी आहे का? याची खात्री करून घेतली. परीक्षा केंद्रात सकाळी साफसफाई आणि पेपरची तयारी सुरू होती.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यावर्षी कोल्हापुरातील विभागात असणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण ३५४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी विभागातील १ लाख ५० हजार ३७५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे.
गुरुवारी सकाळी अकरा वाजता मराठीच्या पेपर परीक्षेला सुरुवात होईल. परीक्षेतील कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी विभागात शिक्षण मंडळातर्फे एकूण १९ भरारी पथकांची परीक्षा केंद्रांवर नजर राहणार आहे.
अधिकृत वेळापत्रक पहावे
परीक्षार्थींनी शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत वेळापत्रक पाहावे. सोशल मीडियावरून फिरत असलेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार यांनी केले आहे. सचिव पवार म्हणाल्या, परीक्षेच्या कालावधीत परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे.
परीक्षा केंद्रांवर पेपरच्या आधी अर्धा तास परीक्षार्थींनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळी अकरा वाजता पेपर असणाºया परीक्षार्थींना साडेदहा वाजता परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल. त्यांना १० वाजून ४० मिनिटांनी उत्तरपत्रिका आणि १० वाजून ५० मिनिटांनी प्रश्नपत्रिका देण्यात येईल. त्यांना अकरा वाजता लिहिण्याची परवानगी दिली जाईल.
जिल्हानिहाय परीक्षार्थी
जिल्हा नियमित पुर्नपरीक्षार्थी
कोल्हापूर ५९,८४० १३१६
सांगली ४३,७१५ १६८५
सातारा ४२,३६१ १४५८