कोल्हापूर : व्हीलचेअर मॅरॅथॉनमध्ये पन्हाळ्याचा दुचाकी मॅकेनिक संतोष रांजगणे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:43 AM2018-09-13T11:43:54+5:302018-09-13T11:52:43+5:30
पन्हाळा तालुक्यातील राक्षी गावचे सुपुत्र जन्मापासून दोन्ही पायाने दीव्यांग असलेले संतोष रांजगणे यांनी चेन्नई येथे झालेल्या कोटक व्हीलचेअर मॅरॅथॉन मध्ये प्रथम क्रमांक मिळवून पन्हाळ्याचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकावला आहे. २ तास १३ मिनिटे २१ सेकंदात रांजगणे यांनी हे २१ किलोमीटरचे अंतर व्हीलचेअर वरून पार केले आहे.
पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील राक्षी गावचे सुपुत्र जन्मापासून दोन्ही पायाने दीव्यांग असलेले संतोष रांजगणे यांनी चेन्नई येथे झालेल्या कोटक व्हीलचेअर मॅरॅथॉन मध्ये प्रथम क्रमांक मिळवून पन्हाळ्याचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकावला आहे. २ तास १३ मिनिटे २१ सेकंदात रांजगणे यांनी हे २१ किलोमीटरचे अंतर व्हीलचेअर वरून पार केले आहे.
जन्मापासून दोन्ही पाय निकामी असलेले रांजगणे नियतीशी झगडत आपला दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय वाघबीळजवळ दानेवाडी येथे करतात. गेल्या एक वर्षापासून ते दीव्यांगांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात.
त्याचाच भाग म्हणून त्यांनी चेन्नई येथे दर वर्षी होणा-या कोटक व्हीलचेअर मॅरॅथॉन मध्ये भाग घ्यायचे ठरवले. दिव्यांग असले तरी लहानपणापासून कष्टाच्या कामाची सवय असल्याने या स्पर्धेत रांजगणे यांनी कमीत कमी वेळात हे २१ किलोमीटरचे अंतर पार करून प्रथम क्रमांक मिळवला.
नेपाळचे रामबहादूर तमन यांनी ही मॅरॅथॉन २ तास १६ मिनिटे आणि ५४ सेकंदात पूर्ण करून दूसरा क्रमांक तर राजीव कुमार यांनी ही २ तास ३८ मिनिटात पूर्ण करून तिसरा क्रमांक मिळवला.या मॅरॅथॉन मध्ये देशभरातून ३०० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
संतोष रांजगणे व्हीलचेअर क्रिकेटमध्येही खेळत असून त्यांचा महाराष्ट्राच्या संघात समावेश आहे. कोल्हापूरचे कमलेश कराळे आणि अनिल पवार हे ही महाराष्ट्राच्या संघात आहेत. नुकत्याच झालेल्या इंडियन व्हीलचेअर प्रिमियर लिग या स्पर्धेत संतोष यांना मॅन अॉफ द मॅच आणि बेस्ट बॉलर अॉफ द सिरीज म्हणून घोषित करण्यात आले.
या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जाण्या येण्याचा खर्च संतोष दुचाकी मॅकेनिक म्हणून काम करुन आलेल्या पैशातून करतात. शिवाय त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारीही आहे.