कोल्हापुरात पाच रुपयांत पोटभर भाजी-चपातीचे जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:30 AM2018-03-19T00:30:45+5:302018-03-19T00:30:45+5:30

In the Kolhapur, five-rupee full-grain vegetable-chapati | कोल्हापुरात पाच रुपयांत पोटभर भाजी-चपातीचे जेवण

कोल्हापुरात पाच रुपयांत पोटभर भाजी-चपातीचे जेवण

googlenewsNext

समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये केवळ पाच रुपयांमध्ये भाजी-चपातीचे जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. एवढ्यावरच न थांबता शहरातील वयोवृद्ध दाम्पत्यांच्या घरी दोन्ही वेळचा जेवणाचा डबाही पोहोच करण्यात येणार आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबविले. त्यांनी रद्दी गोळा करून त्यामध्ये स्वत:चे पैसे घालून त्यातून समाजोपयोगी उपक्रम राबविले. शहरामध्ये संस्कार केंद्रे सुरू करण्यापासून ते कार्यकर्त्याला सॅँडविचचा स्टॉल सुरू करून देण्यापर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी पुढाकार घेतला.
याचाच पुढील टप्पा म्हणजे आता त्यांनी भुकेशी संबंधित तीन उपक्रम आखले आहेत. कोल्हापूर शहरामध्ये अनेक घरांमध्ये केवळ वयोवृद्ध दाम्पत्ये राहतात. एकीकडे औषधे सुरू असतात; परंतु जेवणाचा कंटाळा केला जातो. अनेकदा शिळे खाल्ले जाते. अनेकांना मुले आहेत; पण ती नोकरीनिमित्त बाहेर आहेत. परिस्थितीअभावीही अनेकांना पोटभर चांगले अन्न मिळत नाही. अशा वयोवृद्ध दाम्पत्यांना दोन्ही वेळचे जेवण मोफत घरपोहोच करण्यात येणार आहे.
दुसऱ्या योजनेमध्ये केवळ पाच रुपयांमध्ये भाजी-चपातीचे जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. कॉलेजला जाणाºया युवक-युवतींपासून ते लक्ष्मीपुरीमध्ये काम करणाºया कामगारांपर्यंत अनेकांना सकाळी १५ रुपयांचा वडापावचा नाश्ताही परवडत नाही. शहर आणि ग्रामीण भागांतील अनेक मुलांना सकाळी लवकर बाहेर पडावे लागते. अशा सर्वांसाठी एका वेळच्या नाश्त्यासाठीही पंचवीस-तीस रुपये खर्च करणे परवडणारे नसते;
म्हणूनच अशा सर्वांसाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
तिसºया योजनेत कोल्हापूर
शहरातील ज्या रुग्णालयातील नातेवाइकांकडून मागणी येईल, त्यांना त्या रुग्णालयात जेवण पोहोच केले जाणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे.

काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला तुम्ही ज्या गावात राहता त्या गावातील एकही माणूस उपाशी राहता कामा नये, अशी सूचना केली आणि त्यासाठी मी काम करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरमध्ये अतिशय माफक दरामध्ये भाजी-चपातीचे जेवण, वृद्ध दाम्पत्यांना मोफत डबे आणि मागणीप्रमाणे रुग्णालयातील नातेवाइकांसाठी जेवण पुरविले जाणार आहे. यासाठी ‘स्वयंसिद्धा’च्या कांचनताई परुळेकर यांचे सहकार्य मी घेणार आहे. पुढील महिन्यात या उपक्रमाची सुरुवात व्हावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे.
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

Web Title: In the Kolhapur, five-rupee full-grain vegetable-chapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.