Kolhapur Flood: कोल्हापूर का बुडालं? एक लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर; दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 08:20 AM2021-07-25T08:20:24+5:302021-07-25T08:20:57+5:30

कोल्हापूरची राधानगरी व काळम्मावाडी ही दोन प्रमुख धरणे भरली नसतानाही महापूर आला त्याचे पडलेला प्रचंड पाऊस हे एक महत्त्वाचे नैसर्गिक कारण आहेच

Kolhapur Flood: Migration of more than one lakh people; In two days the pattern of rain changed | Kolhapur Flood: कोल्हापूर का बुडालं? एक लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर; दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला

Kolhapur Flood: कोल्हापूर का बुडालं? एक लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर; दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात  शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीची पूरपातळी शनिवारी संध्याकाळपर्यंत एक फुटाने उतरली. मात्र, महापुराची परिस्थिती जैसे थे असून, शहरातील ४० टक्के भाग पुराच्या पाण्याने वेढलेला आहे. कोल्हापूरशी संबंधित पाचही प्रमुख रस्त्यांवर पाणी असल्याने इतर जिल्ह्यांशी असलेला संपर्क तुटलेला आहे. पावसामुळे तब्बल  एक लाखाहून अधिक जणांना स्थलांतर करावे लागले आहे. 

सध्या जिल्ह्यात एनडीआरएफच्या पाच तुकड्या कार्यरत असून लष्कराचे ७५ जवान शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांचे स्थलांतर करत आहेत. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथे महापुराचे पाणी असून कोकणाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. 

हंगामातील ३० टक्के पाऊस पडला दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळा हंगामात सुमारे चार महिन्यांत जेवढा पाऊस पडतो, त्यातील तब्बल एक तृतांश म्हणजे ३० टक्के पाऊस अवघ्या दीड-दोन दिवसांत कोसळल्याने जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसल्याचे चित्र समोर आले आहे. पावसाचा हा बदललेला पॅटर्न अधिक धोक्याचा आणि नुकसानकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी २०१९ ला ही असाच तुफानी पाऊस कोसळला होता. कोकणच्या खालोखाल पाऊस पडणारा घाटमाथ्यावरील जिल्हा अशी कोल्हापूरची पारंपरिक ओळख आहे. या जिल्ह्यात एकूण १४ नद्या वाहतात. जिल्ह्यात साधारणत: जूनपासून सप्टेंबरपर्यंत किमान ८५० ते ९०० मिलीमीटर पाऊस पडत असल्याच्या नोंदी आहेत. त्यातही पावसाच्या प्रमाणातही असमतोल आहे. यंदाच्या पावसाळ्यात गुरुवार आणि शुक्रवारी ३३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यावरून पावसाची तीव्रता काय असू शकेल याचा अंदाज येऊ शकतो.

कोल्हापूरची राधानगरी व काळम्मावाडी ही दोन प्रमुख धरणे भरली नसतानाही महापूर आला त्याचे पडलेला प्रचंड पाऊस हे एक महत्त्वाचे नैसर्गिक कारण आहेच. धरणक्षेत्रात पडलेला पाऊस धरणात अडवला जातो; परंतु यंदा धरण क्षेत्राबाहेरच (फ्री कॅटमेंट) जास्त पाऊस पडला तो सगळा वाहून नदीतून महापुरास कारणीभूत ठरला आहे. नदी पात्रालगत झालेली प्रचंड बांधकामे, नाले-ओढे भिंती बांधून बंदिस्त केल्याचा परिणाम आणि त्याकडे महापालिकेने केलेले दुर्लक्षही तितकेच कारणीभूत आहे.
 

सांगली : कृष्णेचे पाणी ५२ फुटांवर
जिल्ह्यातील कृष्णा व वारणाकाठची पूरस्थिती शनिवारी तीव्र झाली असली तरी रविवारी महापुराचा विळखा सुटण्याची शक्यता आहे. धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने नदीच्या पाणीपातळीत घट होत आहे. सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणीपातळी २४ तासांत दहा फुटाने वाढली. सांगली व इस्लामपूरचा संपर्क तुटला.

कोयना : दरवाजे साडेेपाच फुटांवर
सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर मंदावल्याने कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली. धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर आणण्यात आले. धरणातून ३०,२४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत ८७.३७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अनेक मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. 

चिपळूण, खेडमध्ये पंचनामे सुरू
 चिपळूण आणि खेडमधील संपूर्ण बाजारपेठच पुराच्या पाण्यात गेल्यामुळे दोन्ही शहरांमध्ये मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम शनिवारपासूनच हाती घेतले आहे. इतिहासात प्रथमच दोन दिवसांत ६०० मि. मी. पावसाची नोंद चिपळूणमध्ये झाली आहे.  आजवर २००५ च्या पुराची पाणी पातळी विक्रमी मानली जात होती. मात्र, यावेळी आलेला पूर त्याहीपेक्षा कितीतरी भयानक होता. 

Web Title: Kolhapur Flood: Migration of more than one lakh people; In two days the pattern of rain changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.