Kolhapur Flood: रस्त्यावर तीन फुटांपर्यंत पाणी, पुणे-बंगळूर महामार्ग अजूनही बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 11:47 AM2021-07-25T11:47:26+5:302021-07-25T11:48:24+5:30
Kolhapur Flood Update: पुणे-बंगळूर महामार्गावरील कोल्हापूरपर्यंतची वाहतूक आज रविवारीही (दि २५) बंद आहे.. शुक्रवारी सायंकाळपासून ही वाहतूक ठप्प असल्याने वाहनांच्या प्रचंड रांगा रस्त्याच्या दुतर्फा लागून राहिल्या आहेत.
- विश्वास पाटील
कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावरील कोल्हापूरपर्यंतची वाहतूक आज रविवारीही (दि २५) बंद आहे.. शुक्रवारी सायंकाळपासून ही वाहतूक ठप्प असल्याने वाहनांच्या प्रचंड रांगा रस्त्याच्या दुतर्फा लागून राहिल्या आहेत. कोल्हापूरजवळच्या पुलाची शिरोली जवळ रस्त्यावर अजूनही सुमारे तीन फुटाहून जास्त पाणी आहे. पुराचे पाणी कमी होण्याची गती फार संथ आहे.त्यामुळे आज पूर्ण दिवस आणि रात्रीही पावसाने चांगली विश्रांती दिली तर उद्या सोमवारी (दि २६) सकाळी वाहतूक सुरू होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
पुणे ते बंगळूर महामार्गावर किमान चार ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. त्यातील कराडजवळ मांडनदीचे पाणी मालखेड गावाजवळ रस्त्यावर आलेले पाणी शनिवारी सकाळी उतरले. पण सांगली जिल्ह्यातील कणेगावजवळ, पुढे कोल्हापूरजवळ पुलाची शिरोलीजवळ, कागलवेशीवर आयबीपी पंपावजवळ आणि पुढे कर्नाटकातील यमगर्णी येथे रस्त्यावर आज रविवारीही रस्त्यावर जास्त पाणी आहे. वारणा आणि पंचगंगेच्या पाण्याची पातळी फार संथगतीने कमी होत आहे. शनिवार सकाळपासून पावसाने पूर्ण उसंत दिल्याने सायंकाळपर्यंत पंचगंगा नदीचे पाणी सुमारे अडीच-तीन फुटांनी कमी झाले होते. त्यामुळे रविवारी महामार्ग सुरू होईल अशी शक्यता होती पण ती फोल ठरली.
महामार्ग बंद झाल्यावर लोक पुणे, सातारा, कराड येथे शक्य तिथे थांबले आहेत. त्यांना सोमवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. हा महामार्ग शुक्रवारी (दि २३) सायंकाळी पाच वाजल्यापासून सुमारे ४० तास झाले ठप्प आहे.