कोल्हापूर पूर : मिळेल त्या साधनाने, विविध मार्गाने प्रत्येक जण करतोय पूरग्रस्तांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 04:06 PM2019-08-09T16:06:02+5:302019-08-09T16:06:16+5:30

जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक हे सगळेच मिळेल त्या साधनाने अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत.

kolhapur flood: With the tools available, everyone is helping the flood victims in various ways | कोल्हापूर पूर : मिळेल त्या साधनाने, विविध मार्गाने प्रत्येक जण करतोय पूरग्रस्तांची मदत

कोल्हापूर पूर : मिळेल त्या साधनाने, विविध मार्गाने प्रत्येक जण करतोय पूरग्रस्तांची मदत

Next

कोल्हापूर :लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदल, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक हे सगळेच मिळेल त्या साधनाने अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. कुणी तराफ्यावरून, दोरीच्या सहाय्याने, प्लास्टिक खुर्चीच्या मदतीने तर कुणी प्लास्टिक बॅरेलच्या सहाय्याने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत.

टाकवडे येथील आधार रेस्क्यू फोर्सने ग्रामस्थांच्या मदतीने शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील पूरग्रस्तांना तराफ्यावरून बाहेर काढले आहे. शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड, बहिरेवाडी येथे एनडीआरएफ पूरग्रस्तांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढत आहेत. भुदरगड तालुक्यातील मडुर, वासनोली, पाळ्याचा हुडा, चोपडेवाडी येथील चार गरोदर महिलांना यांत्रिक बोटीचा वापर करून गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात सुखरूप दाखल करण्यात आले.

हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी येथील अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रेस्क्यू यंत्रणा पार पाडावी लागली. मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक या महिला कर्मचाऱ्यांनी गावात थांबून दोरीच्या सहाय्याने पूरग्रस्तांची सुटका केली. एसटी परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकचे बॅरेल आणि बांबूपासून तराफा बनवून स्थानिक तरुणांच्या सहकार्याने पूरग्रस्तांची सुटका केली आहे. तर काही ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या प्लास्टिक खुर्चीच्या माध्यमातून वृद्धांना पाण्यातून बाहेर काढले आहे.

आंबेवाडीमध्ये अडकलेल्या लोकांना चेअर नॉटच्या सहाय्याने दुसऱ्या मजल्यावरून आपत्ती व्यवस्थापकांनी रोप रेस्क्यू केला. शिरोळ तालुक्यातील राजापूर येथे नौदलाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबविले आहे. या जवानांसाठी पालकमंत्र्यांनी 100 चादरी शिरोळ येथील शिबिरामध्ये दिले आहेत. शहरातील विविध ठिकाणी सेवाभावी संस्थांनी शिबिरांमध्ये पूरग्रस्तांसाठी भोजन, निवास आदीची सोय केली आहे. त्यामध्ये शिरोली मधील मदरसाही सहभागी झाला आहे.

सोशल मीडिया, व्हॉट्सऍप, फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर या समाज माध्यमांवरूनही विविध सेवाभावी संस्था आणि युवक मंडळांनी, पत्रकारांनी मदतीबाबत आपला सहभाग नोंदवला आहे. विशेषत: चादरी, भोजन, पाणी, औषधे आदींची मदत देण्याबाबत विविध संपर्क क्रमांक याबाबतच्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष सहभागही नोंदवला आहे. आलेल्या या नैसर्गिक आपत्तीत सर्वच यंत्रणांनी जमेल त्या मार्गाने आपला सहभाग नोंदवला आहे. माणसांबरोबरच प्राण्यांनाही वाचविण्यात यश आलं आहे. त्यामुळेच सध्या पूरपरिस्थिती नियंत्रणात आहे.

Web Title: kolhapur flood: With the tools available, everyone is helping the flood victims in various ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.