Kolhapur Flood: चिंचवाड मध्ये अडकले दोनशे साठ नागरिक, साठ जनावरांना चारा मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 03:13 PM2021-07-25T15:13:36+5:302021-07-25T15:13:36+5:30
Kolhapur Flood: चिंचवाड (ता.शिरोळ) येथे संपूर्ण गावाला कृष्णा नदीचा वेढा पडला आहे.अशा परिस्थितीत ही तलाठी, ग्रामसेवक याच्यासह तब्बल 260 नागरीक अडकले आहेत.
- शुभम गायकवाड
उदगाव (शिरोळ) - चिंचवाड (ता.शिरोळ) येथे संपूर्ण गावाला कृष्णा नदीचा वेढा पडला आहे.अशा परिस्थितीत ही तलाठी, ग्रामसेवक याच्यासह तब्बल 260 नागरीक अडकले आहेत. त्याचबरोबर 60 जनावरे ही अडकली आहेत. त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आम्हाला बाहेर काढा अशी आग्रही मागणी पुरात अडकलेल्या नागरीकातून होत आहे.
चिंचवाडला गेल्या दोन पुरात संपूर्ण गावाला वेढा पडला होता. यावेळी ही संपुर्ण गावाला कृष्णा नदीच्या महापूराचा वेढा पडला आहे. 2019 मध्ये तब्बल 350 नागरीक अडकले होते. त्यावेळी मोठया प्रयत्नानंतर बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले होते. या पुराचा अनुभव गाठीशी असतानाही चिंचवाड गावामध्ये सध्या 260 नागरीक पुराच्या पाण्यात अडकुन पडले आहेत. चिंचवाडला जाण्यासाठी असणारे अर्जुनवाड, शिरोळ, उदगांव हे तिन्ही मार्ग बंद आहेत. येथील ग्रामविकास अधिकारी हणवते, तलाठी तमायचे, आरोग्य सेवक मुजावर हेही पुरातच अडकुन राहीले आहेत.
अधिकारी वर्गाने नागरीकांना तात्काळ बाहेर काढून सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची गरज होती.गावातून बाहेर स्थलांतर केलेल्या नागरिकांची आरोग्य, जेवण, राहण्याची व्यवस्था करणे अगत्याचे असताना अधिकारीच अडकल्याने मोठी पंचाईत झाली.त्यामुळे आम्हाला प्रशासनाने तात्काळ बाहेर काढावे, अशी मागणी पुरात अडकलेल्या नागरीकांनी केली आहे.