कोल्हापूर चक्का जाम!

By admin | Published: February 1, 2017 01:24 AM2017-02-01T01:24:26+5:302017-02-01T01:24:26+5:30

मराठा समाजाचे ३० ठिकाणी आंदोलन : महामार्गावरील वाहतूक ठप्प

Kolhapur flywheel jam! | कोल्हापूर चक्का जाम!

कोल्हापूर चक्का जाम!

Next

कोल्हापूर : मराठा आरक्षणासह विविध न्याय्य मागण्यांसाठी कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील ३० ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ‘एक मराठा - लाख मराठा’चा एल्गार पुन्हा पुकारत मराठा समाजातील हजारो आबालवृद्ध रस्त्यावर उतरले. त्यांनी मराठा क्रांती मोर्चाप्रमाणेच शांततेचे व शिस्तबद्धतेचे दर्शन या आंदोलनातून घडविले. आंदोलनामुळे जिल्ह्यातून जाणारा पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, राज्य आणि विविध मार्गांवरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली. या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, दसरा चौकात मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
विविध न्याय्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने राज्यभर ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारले होते. यात मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाज उत्स्फूर्तपणे सहभागी झाला.पूर्वनियोजनानुसार आंदोलनाच्या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून मराठा समाजातील महिला, पुरुष, युवक-युवती हातात भगवा ध्वज, मागण्यांचे फलक घेऊन जमू लागले. काही वेळातच आंदोलनाची ठिकाणे गर्दीने फुलली. यानंतर ‘एक मराठा - लाख मराठा,’ ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘जय भवानी - जय शिवाजी’ अशा विविध घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी रस्त्यांवर ठिय्या मारत मार्गावरील वाहतूक रोखली. त्यामुळे जिल्ह्णातून जाणारा पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग अशा विविध मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या दोन ते पाच किलोमीटरपर्यंत अशा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली. आंदोलनात मराठा बांधवांसह भगिनीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शिवाजी पूल, दसरा चौक, नंगीवली चौक, आदी ठिकाणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. आंदोलनासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. मागण्यांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या विरोधातील खदखद मराठा समाजाने या आंदोलनातून शांततेत व्यक्त केली. शिवाय, आरक्षणासह विविध मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय लढा थांबणार नसल्याचा निर्धारही दाखवून दिला. (प्रतिनिधी)


या ठिकाणी
झाले आंदोलन
शिरोली टोलनाका, शिवाजी पूल, न्यायसंकुलासमोर कसबा बावडा, दसरा चौक, नंगीवली चौक, मंगळवार पेठ (कोल्हापूर शहर). बालिंगा पूल, परिते फाटा, उचगाव-सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव (करवीर तालुका). साळवण (गगनबावडा), सिद्धनेर्ली नदीकिनारा, केनवडे (कागल). जयसिंगपूर, अंकली नाका, कुरुंदवाड, शिरदवाड (शिरोळ). तहसील कार्यालय चौक, हुपरी, रेंदाळ, पट्टणकोडोली, पेठवडगाव (हातकणंगले). बांबवडे (शाहूवाडी), छत्रपती चौक - गडहिंग्लज, आजरा-सावंतवाडी मार्ग, नेसरी फाटा. वाघबीळ, कोडोली-वाठार मार्ग, सातवे-कोडोली मार्ग ( पन्हाळा) आणाजे बिद्री (राधानगरी), गारगोटी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.


...अन्यथा लढाऊ बाणा तीव्र करणार
मराठा आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती व्हावी, अशा विविध २० न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा समाजाने यापूर्वी राज्यभर क्रांती मोर्चे काढले. मात्र, यानंतर सरकारने मागण्यांच्या पूर्ततेबाबत अपेक्षित गतीने कार्यवाही केली नाही; त्यामुळे समाजातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आल्याचे सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक यांनी सांगितले. ते म्हणाले, कोल्हापूर शहरात येणाऱ्या सर्व मार्ग आणि जिल्ह्यातील एकूण ३० ठिकाणी चक्का जाम करण्यात आले. यातून पुन्हा एकदा लढाऊ बाण्याच्या मराठा समाजाने शांतता व शिस्तबद्धतेचा संदेश दिला आहे. या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने लवकरात लवकर मागण्यांची पूर्तता करावी. अन्यथा समाजातर्फे लढाऊ बाणा तीव्र केला जाईल. मराठ्यांनी आपली तलवार म्यान केलेली नाही, हे सरकारने लक्षात घ्यावे. मुंबईतील मोर्चातून पुन्हा समाजाची ताकद दाखवून दिली जाईल.

Web Title: Kolhapur flywheel jam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.