कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींत विश्वचषकाची धून! काऊंटडाऊन सुरू : कमालीची उत्कंठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:45 AM2018-05-30T00:45:01+5:302018-05-30T00:45:01+5:30
अवघ्या सोळा दिवसांवर येऊन ठेपलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘किक आॅफ’ची उत्कंठा करवीरकरांनाही लागून राहिली आहे. अनेक फुटबॉल चाहत्यांकडून सोशल मीडियावरून
कोल्हापूर : अवघ्या सोळा दिवसांवर येऊन ठेपलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘किक आॅफ’ची उत्कंठा करवीरकरांनाही लागून राहिली आहे. अनेक फुटबॉल चाहत्यांकडून सोशल मीडियावरून ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल), लिओनल मेस्सी (अर्जेंटिना), ज्युनिअर नेम्मार (ब्राझील), ओलिवर (फ्रान्स) आदी फुटबॉल खेळाडूंचा खेळाच्या चित्रफिती फिरू लागल्या आहेत.
कोल्हापुरातही गेल्या चार महिन्यांत के.एस.ए. लीग फुटबॉल स्पर्धा, अटल चषक, महापौर चषक, राजेश चषक, सतेज चषक या फुटबॉल स्पर्धा झाल्या आहेत, तर आता ‘फुटबॉल महासंग्राम’च्या रूपाने १० जूनपर्यंत फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. यातही चाहत्यांसह खेळाडूंनाही बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर टिकून राहावा म्हणून संयोजकांकडून स्त्री व पुरुष क्रीडारसिकांना चक्क दुचाकी बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय शाहू स्टेडियममधील भल्या मोठ्या फुटबॉलची प्रतिकृती , विख्यात फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फायबरमधील ७ फूट उंचीचा पुतळा आकर्षण ठरला आहे. ‘हासंग्राम’मध्येही फुटबॉलची क्रेझ आणखी वाढावी म्हणून संयोजकांनी जगप्रसिद्ध नाईकी या कंपनीचे दहा फुटबॉल जर्मनीहून मागविले आहेत. त्यांचाही वापर या स्पर्धेसाठी होते आहे.
या सामन्याकडे करवीरकरांचे लक्ष
१५ जून - पोर्तुगाल विरुद्ध स्पेन, १६ जून - फ्रान्स विरुद्ध आॅस्ट्रेलिया, अर्जेंटिना विरुद्ध आयर्लंड, पेरू विरुद्ध डेन्मार्क, १७ जून - जर्मनी विरुद्ध मेक्सिको, ब्राझील विरुद्ध स्वीत्झर्लंड, १८ जून - बेल्जियम विरुद्ध पनामा, १९ जून - कोलंबिया विरुद्ध जपान, २० जून - पोर्तुगाल विरुद्ध मोरक्को, २१ जून - इराण विरुद्ध स्पेन, डेन्मार्क विरुद्ध आॅस्ट्रेलिया, फ्रान्स विरुद्ध पेरू, २३ जून - जर्मनी विरुद्ध स्वीत्झर्लंड, २४ जून - इंग्लंड विरुद्ध पनामा.