कोल्हापूर : ‘शिवछत्रपती’साठी राज्य सरकारकडून ‘फुटबॉल’ उपेक्षित, प्रशिक्षकांच्या प्रस्तावांना ‘केराची टोपली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 07:16 PM2018-02-13T19:16:15+5:302018-02-13T19:18:45+5:30

सर्व खेळांना समान न्याय असतानाही फुटबॉलला यंदाही नियमावली दाखवून ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून उपेक्षित ठेवण्याचे काम राज्याच्या क्रीडा खात्याने केले आहे. यंदाही खात्याने हाच राग आळवत फुटबॉलमधील प्रशिक्षकांच्या प्रस्तावांना ‘केराची टोपली’ दाखविली आहे.

Kolhapur: 'Football' neglected by state government for 'Shiv Chhatrapati', 'karachi basket' for trainers' proposals | कोल्हापूर : ‘शिवछत्रपती’साठी राज्य सरकारकडून ‘फुटबॉल’ उपेक्षित, प्रशिक्षकांच्या प्रस्तावांना ‘केराची टोपली’

कोल्हापूर : ‘शिवछत्रपती’साठी राज्य सरकारकडून ‘फुटबॉल’ उपेक्षित, प्रशिक्षकांच्या प्रस्तावांना ‘केराची टोपली’

Next
ठळक मुद्दे ‘शिवछत्रपती’साठी राज्य सरकारकडून ‘फुटबॉल’ उपेक्षितप्रशिक्षकांच्या प्रस्तावांना ‘केराची टोपली’

सचिनभोसले

 कोल्हापूर : सर्व खेळांना समान न्याय असतानाही फुटबॉलला यंदाही नियमावली दाखवून ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून उपेक्षित ठेवण्याचे काम राज्याच्या क्रीडा खात्याने केले आहे. यंदाही खात्याने हाच राग आळवत फुटबॉलमधील प्रशिक्षकांच्या प्रस्तावांना ‘केराची टोपली’ दाखविली आहे.

राज्य शासनातर्फे दरवर्षी खो-खो, कबड्डी, हँडबॉल, आट्यापाट्या, बास्केटबॉल, क्रिकेट, हॉकी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कराटे, कुस्ती, अशा खेळांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करते. त्यात खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षक, मार्गदर्शक व संघटकांनाही पुरस्कार देऊन गौरव करते. त्यात काही खेळांमध्ये किमान दहा खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले असावेत, असा निकष लावण्यात आला आहे.

या नियमांत फुटबॉल हा खेळही बसत आहे. त्यामुळे एखाद्या प्रशिक्षकाला महाराष्ट्रासारख्या राज्यातून फुटबॉलमधून एक खेळाडू घडविताना किती कष्ट घ्यावे लागतील याचा विचारच न केलेला बरा. अशाच प्रकारची कामगिरी राज्यातून अनेक फुटबॉल प्रशिक्षक करत आहेत. मात्र, राज्य शासनाच्या नियमावलीत त्यांच्या कामगिरीची दखलच घेतली जात नाही.

आॅक्टोबर २०१७ मध्ये भारतात झालेल्या युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत राज्याचा एकमेव फुटबॉलपटू अनिकेत जाधव भारताकडून खेळला. त्याला घडविण्यात मोलाचा वाटा असलेले पुण्याचे प्रशिक्षक जयदीप अंगीरवाल हेही ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे अंगीरवाल हे वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राने पटकाविलेल्या संतोष ट्रॉफी विजेत्या संघातील खेळाडू आहेत.

त्याबरोबरच अनिकेत जाधवसह मोहन बागानकडून खेळणारा निखिल कदम, २३ वर्षांखालील भारतीय संघातील गोलरक्षक सुखदेव पाटील याच्यासह अनेक खेळाडू घडविले आहेत तरीही क्रीडा खाते म्हणते तुम्ही दहा आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले नाहीत. मग खेळ वाढविणाऱ्या प्रशिक्षकांना सरकारकडून प्रोत्साहन तर राहू देच पण सन्मानही मिळणे कठीण आहे.

त्यामुळे १७ वर्षाखालील विश्वचषकादरम्यान मुख्यमंत्र्यांंचे ‘फुटबॉल मिशन वन’केवळ फुटबॉलचा प्रसार करण्याकरीता होते की, ‘चमकोगिरी’साठी होते, असा सवालही फुटबॉल रसिकांकडून विचारला जात आहे.

 

जगातील २०७ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. कोलकाता, गोवा या शहरानंतर कोल्हापुरातही हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. त्यात रसिकांसह खेळाडूंची खाणही याच कोल्हापुरात आहे तरीही क्रीडा खात्याच्या क्रीडाप्रबोधिनीत सर्व खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळते. मात्र, फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळत नाही.

राज्यात सद्य:स्थितीत एकूण १३ क्रीडाप्रबोधिनी आहेत. त्यातील पुणे येथील बालेवाडीमध्येच फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळते. हीच सोय कोल्हापूर, नागपूर, मुंबई येथे मिळाली तर महाराष्ट्रातून अनेक फुटबॉलपटू देशाला मिळतील. खेळाच्या प्रसारासाठी अशीही अपेक्षा अंगीरवार यांनी बोलून दाखविली.

 

युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मला थेट पुरस्कार जाहीर होईल असे वाटत होते. मात्र, निराशाच पदरी पडली. विशेष म्हणजे मी क्रीडा प्रबोधिनीत काम करत असतानाही अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू घडविले आहेत तरीही कागदोपत्री मला हा पुरस्कार मिळू शकत नाही. या पुरस्कारासाठी अन्य कोणती कॅटगिरी लागते का?. की माझ्या पाठीमागे गॉडफादर नाही, म्हणून हा पुरस्कार मला मिळाला नाही.
- जयदीप अंगीरवाल,
फुटबॉल प्रशिक्षक, पुणे

 

राज्य शासनाने फुटबॉलला बळ देणाऱ्या हातांचा गौरव केला तरच हा खेळ वाढेल. त्यातून जयदीप अंगीरवाल यांच्यासारखे रत्नपारखी देशाला व राज्याला फुटबॉलमधील अनिकेत, निखिल, सुखदेवसारखे रत्न देऊ शकणार नाहीत. सन २०१८-१९ या वर्षासाठी तरी क्रीडा खात्याने थेट अंगीरवाल यांना पुरस्कार जाहीर करून ही उणीव भरून काढावी.
- विकास पाटील,
माजी फुटबॉलपटू

 

 

 

Web Title: Kolhapur: 'Football' neglected by state government for 'Shiv Chhatrapati', 'karachi basket' for trainers' proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.