कोल्हापूर : तोलाईदारांच्या संपामुळे चार कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:54 AM2018-12-13T10:54:25+5:302018-12-13T11:00:18+5:30
कोल्हापूर : इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मोजमाप केलेल्या मालाची तोलाई शेतकऱ्यांकडून घेता येणार नाही, असा आदेश पणन विभागाकडून आला आहे. या ...
कोल्हापूर : इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मोजमाप केलेल्या मालाची तोलाई शेतकऱ्यांकडून घेता येणार नाही, असा आदेश पणन विभागाकडून आला आहे. या विरोधात कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील तोलाईदारांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे कांदा-बटाटा, गुळासह इतर बाजारातील सुमारे चार कोटींची उलाढाल ठप्प झाली.
बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याची सक्ती २०१४ ला तत्कालीन पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी केली होती. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मोजमाप केलेल्या शेतीमालाची तोलाई, अडत व हमाली शेतकऱ्यांच्या पट्टीतून घेऊ नये, असा आदेशही त्यांनी काढला होता. त्याला विरोध झाल्यानंतर तत्कालीन सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘अडत बंद’चा निर्णय कायम ठेवत हमाली व तोलाईच्या निर्णयास स्थगिती दिली.
तोलाईदारांनी काम बंद आंदोलन केल्याने बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये अशी सामसूम होती. (छाया- नसीर अत्तार)
गेली चार वर्षे त्याबाबत काहीच हालचाली नव्हत्या; पण पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थगिती उठविल्याची चर्चा पणन मंडळाच्या पातळीवर सुरू असल्याने तोलाईदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
या निर्णयाविरोधात तोलाईदार महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा देत काम बंद केले. बाजार समितीमधील सर्वच विभागांचे कामकाज होऊ न शकल्याने सुमारे चार कोटींची उलाढाल ठप्प झाली.
युनियनच्या वतीने बाजार समितीचे सभापती बाबासो लाड व सचिव मोहन सालपे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व आमदार अमल महाडिक यांना निवेदन देऊन हा अन्यायी निर्णय घेऊ नका, अशी विनंती केली.
यावेळी बाजार समितीचे संचालक बाबूराव खोत, युनियनचे उपाध्यक्ष आकाराम केसरे, अजित पाटील, बाजीराव लव्हटे, संजय सावंत, सरदार चव्हाण, अमित शिंगे, आदी उपस्थित होते.
बाजार समित्यांचे बहुतांश कामकाज इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावरच होते. शेतकऱ्यांकडून तोलाई घ्यायची नसेल तर सरकारने तोलाईदारांना बाजार समित्यांच्या सेवेत घ्यावे.
- बाबूराव खोत,
संचालक, बाजार समिती