कोल्हापूर : चौघाजणांच्या शिकारी टोळीला अटक, चार बंदुका, दारूगोळा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 06:44 PM2018-08-14T18:44:03+5:302018-08-14T18:44:39+5:30
आपटाळ (ता. राधानगरी) येथील चौघाजणांच्या शिकारी टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (दि. १३) अटक केली. त्यांच्या ताब्यातून बेकायदेशीर गावठी एकनळी काडतुसाच्या व ठेसणीच्या चार बंदुका व दारूगोळा जप्त केला आहे.
कोल्हापूर : आपटाळ (ता. राधानगरी) येथील चौघाजणांच्या शिकारी टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (दि. १३) अटक केली. त्यांच्या ताब्यातून बेकायदेशीर गावठी एकनळी काडतुसाच्या व ठेसणीच्या चार बंदुका व दारूगोळा जप्त केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संशयित कृष्णात गणपती पाटील (वय ४९), शिवाजी बाळू जोशी (३८), नाना पांडुरंग पाटील (४२), संजय तुकाराम पाटील (३८, सर्व रा. आपटाळ, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी त्यांना राधानगरी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
नालासोपारा येथील स्फोटकांचा साठा मिळाल्यानंतर राज्यात हाय-अलर्टच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यामध्ये बिगर परवाना रिव्हॉल्व्हर, पिस्तुल, बंदुका अशी हत्यारे बाळगून त्याद्वारे समाजात दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात. तसेच वन्य प्राण्यांची शिकार करतात. अशा व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक सावंत यांना दिले होते.
सावंत यांना पोलीस हवालदार नरसिंग कांबळे, प्रल्हाद देसाई यांचे बातमीदारातर्फे आपटाळ येथील कृष्णात पाटील, शिवाजी जोशी, नाना पाटील, संजय पाटील हे बेकायदेशीर सिंगल बोअर काडतुसाच्या व ठेसणीच्या बंदुका जवळ बाळगून वन्य प्राण्यांची शिकार करीत असतात, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी दुपारी आपटाळ गावी छापे टाकून चौघांच्या घरातून बंदुका जप्त केल्या.
त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली. या सर्व संशयितांना राधानगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, उपनिरीक्षक सचिन पंडित व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती द्या
जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्रे बाळगून दहशत व वन्य प्राण्यांची कोणी शिकार करीत असेल, तर त्यांची माहिती पोलिसांना द्यावी, माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. यापुढे अशा बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे आवाहन पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी केले आहे.