कोल्हापूर : फळ-भाज्या, धान्याचे दर भडकणार, मालवाहतूक संपाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 06:05 PM2018-07-23T18:05:05+5:302018-07-23T18:10:15+5:30
देशव्यापी मालवाहतूक चक्काजाम आंंदोलनाचा परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्याच्या बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सलग चौथ्या दिवशी संप सुरू राहिल्याने फळ-भाजीपाला, धान्य आवक थंडावली असून येत्या दोन दिवसांत संप न मिटल्यास भाववाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोल्हापूर : देशव्यापी मालवाहतूक चक्काजाम आंंदोलनाचा परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्याच्या बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सलग चौथ्या दिवशी संप सुरू राहिल्याने फळ-भाजीपाला, धान्य आवक थंडावली असून येत्या दोन दिवसांत संप न मिटल्यास भाववाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषत: कांदा बटाट्याचे दर भडकण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल चा मुबलक साठा असला तरी मालवाहतूक संपामुळे डिझेलची विक्री सुमारे २५ टक्के घटली आहे.
आॅल इंडिया मोटर्स ट्रॉन्स्पोर्ट काँग्रेस नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी गेले चार दिवस संप सुरू असल्याने मालवाहतुकीची चाके रस्त्याकडेला थांबली आहेत. या संपाचा दैनंदिन जीवनावर हळूहळू परिणाम जाणवू लागला आहे. मालवाहतुकीच्या संपामुळे कोल्हापूरच्या बाजारपेठेत मालाची आवक-जावक पूर्णपणे थंडावली आहे; त्यामुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी शुकशुकाट जाणवत होता.
कांदा-बटाट्याची आवक ८० टक्के घटली, दर स्थिर
कोल्हापूरच्या बाजारपेठेत अहमदनगर, सोलापूर, पुणे या ठिकाणाहून मालवाहतुकीने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. रोज किमान ४५ ते ५० ट्रक कांद्याची आवक होते; पण दिवसभरात फक्त १० ट्रकच कांद्याचे आल्याने सुमारे ८० टक्के कांदा वाहतुकीवर परिणाम जाणवत आहे. याशिवाय कांद्याच्या प्रमाणात बटाट्याचीही आवक आग्रा, इंदोरच्या बाजारपेठेतून कोल्हापुरात होते; पण या आवकेवरही सुमारे ७५ टक्के परिणाम झाला आहे.
हा संप अगोदरच जाहीर केला असल्याने व्यापाऱ्यांनी कांद्याचा साठा करून ठेवल्याने आवक घटली असली तरी कोल्हापुरात कांदा उपलब्ध होऊ लागल्याने अद्यापतरी दरावर कोणताही परिणाम झाला नसून दर स्थिर आहेत.
मालवाहतूकदारांच्या संपामुळे बाजार समितीतील आवक-जावकवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून भाजीपाल्याची रोजची सुमारे ६० टक्के तर फळांची ८० टक्के आवक घटली आहे.
- मोहन सालपे,
सचिव, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती.
मालवाहतूकदारांच्या संपामुळे ट्रकसारखी डिझेलवर धावणारी वाहने रस्त्याकडेला थांबल्याने पंपावर डिझेलचा मुबलक साठा असूनही तो अपेक्षेप्रमाणे उचल होत नाही. या डिझेल विक्रीवर सुमारे २५ टक्के परिणाम झाला आहे.
- गजकुमार माणगावे,
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशन.