कोल्हापूर : गगनबावडा, शाहूवाडी, चंदगडमध्ये दमदार पाऊस, नद्यांच्या पातळीत वाढ, चार बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 07:23 PM2018-07-04T19:23:31+5:302018-07-04T19:25:42+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी गगनबावडा, शाहूवाडी, चदंगड तालुक्यात दमदार पाऊस झाला. उर्वरित तालुक्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पावसाने हजेरी लावल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झालेली आहे. भोगावती नदीवरील एक, तर पंचगंगा नदीवरील तीन, असे चार बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगेची पातळी १७.५ फुटापर्यंत पोहोचली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी गगनबावडा, शाहूवाडी, चदंगड तालुक्यात दमदार पाऊस झाला. उर्वरित तालुक्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पावसाने हजेरी लावल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झालेली आहे. भोगावती नदीवरील एक, तर पंचगंगा नदीवरील तीन, असे चार बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगेची पातळी १७.५ फुटापर्यंत पोहोचली आहे.
सात-आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवार (दि.३)पासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. मंगळवारी उघडझाप राहिली तरी बुधवारी सकाळपासून हळूहळू पाऊस वाढत आहे. गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, राधानगरी, आजरा तालुक्यांत चांगला पाऊस सुरू आहे. उर्वरित तालुक्यात उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.
कोल्हापूर शहरातही दिवसभरात चांगला पाऊस झाला. पाच-दहा मिनिटे पावसाच्या सरी कोसळायच्या, पण पाणी पाणी करत होत्या. दुपारच्या टप्यात पावसाने थोडी उघडीप दिली, पण सायंकाळनंतर शहरात भुरभुर राहिली.
बुधवारी(दि.४) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १५.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सर्वाधिक पाऊस ५२.०० मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला तर सर्वांत कमी हातकणंगले तालुक्यात ४.९ मिलिमीटरची नोंद झाली. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून राधानगरी, दूधगंगा, कुंभी, कोदे या धरणक्षेत्रात चोवीस तासांत अतिवृष्टी झाली आहे. ‘दूधगंगा’ धरणक्षेत्रात ७८ तर ‘कुंभी’ परिसरात ८६ मिलिमीटर पाऊस झाला. ‘भोगावती’ नदीवरील ‘शिंगणापूर’ तर ‘पंचगंगा’ नदीवरील ‘राजाराम’, ‘रूई’ व ‘इचलकरंजी’ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा :
हातकणंगले (४.९), शिरोळ (५.८५), पन्हाळा (१२.२९), शाहूवाडी (२९.८३), राधानगरी (२४.१७), गगनबावडा (५२.००), करवीर (७.००), कागल (१२.५७), गडहिंग्लज (३.१४), भुदरगड (११.००), आजरा (१५.००), चंदगड (१२.५०).