कोल्हापूर : पोलिसांची गांधीगिरी, ‘शाहूं’च्या पुतळ्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:11 AM2018-08-24T11:11:07+5:302018-08-24T11:18:21+5:30

पोलीस सामान्यांपेक्षा वेगळे असतात, अशी अजूनही जनसामान्यांची धारणा आहे. कदाचित अंगावरील वर्दीमुळे त्यांचे हे वेगळेपण नागरिकांना दूर लोटते. अशा वर्दीमधील माणसांना राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती साफसफाई करताना पाहिल्यामुळे गुरुवारी सकाळी शाहूनगर येथील सामान्य नागरिकांना चांगलाच धक्का बसला.

Kolhapur: Gandhigiri of the police took Shamun's statue, breathed freely | कोल्हापूर : पोलिसांची गांधीगिरी, ‘शाहूं’च्या पुतळ्याने घेतला मोकळा श्वास

कोल्हापूर : पोलिसांची गांधीगिरी, ‘शाहूं’च्या पुतळ्याने घेतला मोकळा श्वास

ठळक मुद्देपोलिसांच्या गांधीगिरीमुळे ‘शाहूं’च्या पुतळ्याने घेतला मोकळा श्वासराजारामपुरी पोलिसांचा उपक्रम; सर्व स्तरांतून कौतुक

प्रदीप शिंदे

कोल्हापूर : पोलीस सामान्यांपेक्षा वेगळे असतात, अशी अजूनही जनसामान्यांची धारणा आहे. कदाचित अंगावरील वर्दीमुळे त्यांचे हे वेगळेपण नागरिकांना दूर लोटते. अशा वर्दीमधील माणसांना राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती साफसफाई करताना पाहिल्यामुळे गुरुवारी सकाळी शाहूनगर येथील सामान्य नागरिकांना चांगलाच धक्का बसला. पोलिसांच्या या अनोख्या गांधीगिरीमुळे शाहू महाराजांच्या पुतळ्याने मात्र मोकळा श्वास घेतला.



राजारामपुरीतील शाहूनगर ही कष्टकरी नागरिकांची वसाहत. साधारणपणे या परिसरात तीन ते साडेतीन हजार लोक राहतात. शिक्षणाचा अभाव आणि गरिबी यांमुळे या परिसरात किरकोळ वाद नेहमीच होत असल्याने पोलिसांचा वावरही येथे नेहमीचाच. गुरुवारी सकाळी पोलिसांचे पथक अचानक येथे दाखल होताच, या परिसरात गंभीर घटना घडल्याचा कयास लोकांनी व्यक्त केला. मात्र पोलिसांनी त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरवत, एका वेगळ्याच गांधीगिरीचे दर्शन घडविल्याने नागरिकांना सुखद धक्का बसला.

येथील चौकात राजर्षी शाहू महाराजांचा अर्धपुतळा आहे. त्यास दररोज पुष्पहारही अर्पण केला जातो; मात्र पुतळ्याच्या सभोवतीच्या कुंपणाची मोठी दुरवस्था झाली आहे. काही नागरिक त्यावरच कपडे वाळत घालत असतात. आतील बागेचेही विद्रूपीकरण झाले आहे. तसेच सभोवती असलेल्या, धूळ खात पडलेल्या जुन्या वाहनांमुळे हा पुतळ्याचा परिसर झाकला गेला होता.



राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी अनेकदा या परिसरात भेट दिली असल्यामुळे त्यांनी शाहूंच्या पुतळ्याची दुरवस्था दूर करण्याचे ठरविले. गुरुवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसोबतच त्यांनी या पुतळ्याभोवतीचा परिसर स्वच्छ करण्याच्या मोहिमेस सुरुवात केली.

केवळ स्वच्छता हा यामागील उद्देश नसून परिसरातील नागरिकांना एक प्रकारे वादविवाद, भांडण- तंटा यांपेक्षा चांगल्या उपक्रमाचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या उपक्रमास नागरिकांनी तत्काळ हातभार लावत हा परिसर काही तासांत स्वच्छ केला.



पोलिसांना असलेल्या जबाबदारीचे भान, कामाबद्दलची त्यांची निष्ठा किंवा वरिष्ठांचा धाक अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पोलीस कर्तव्य करीत राहतात. गुन्हेगारी रोखण्यात अपयश येताच ते टीकेचे धनीही ठरतात. अशा नेहमीच्या कामापेक्षा आज काहीतरी वेगळे करीत असल्याची अनुभूती या पोलिसांना आली.



ही फक्त स्वच्छता मोहीम नव्हती, तर नागरिक आणि पोलिसांमधील सुसंवाद वाढून त्याचा उपयोग पोलिसांना जनजागृती आणि गुन्हे कमी करण्यासाठीही निश्चितच होऊ शकतो.
- औदुंबर पाटील,
पोलीस निरीक्षक ,राजारामपुरी पोलीस ठाणे


पोलिसांच्या या उपक्रमामुळे गुन्हेगारी कमी होऊन भयमुक्त वातावरणामध्ये सर्वांना वावरता येणार आहे. अंधश्रद्धेमुळे चौकात नेहमी नैवेद्य, लिंबू ठेवण्याचे अघोरी प्रकार घडतात, ते या स्वच्छता मोहिमेमुळे कमी होण्यास मदत होईल.
- रोहित पोवार, रहिवाशी

 

Web Title: Kolhapur: Gandhigiri of the police took Shamun's statue, breathed freely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.