कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, दोन सराफ दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:14 AM2018-12-11T11:14:22+5:302018-12-11T11:15:59+5:30
सानेगुरुजी वसाहत परिसरात सोमवारी पहाटे चोरट्यांच्या टोळीने अक्षरश: धुमाकूळ घातला. दोन सराफ दुकाने फोडून सात ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला.
कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत परिसरात सोमवारी पहाटे चोरट्यांच्या टोळीने अक्षरश: धुमाकूळ घातला. दोन सराफ दुकाने फोडून सात ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला.
चोरट्यांनी रोख रकमेसह विदेशी मद्याचा बॉक्स, असा सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. रात्रगस्तीच्या करवीर पोलिसांनी चोरट्यांचा थरारक पाठलाग केला; मात्र कटावणी, हातोडा टाकून ते पळून गेले. शहर व उपनगरांत वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीती पसरली आहे.
सानेगुरुजी वसाहत परिसरात मेन रोडच्या बाजूला असलेली सात दुकाने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. दुकानांचे शटर उचकटून साहित्याची मोडतोड केली होती. सुशांत खाडे यांच्या केदारलिंग बेकरीचे व खताळ यांच्या राधिका ज्वेलर्सचे शटर उचकटून आत प्रवेश केला; मात्र या दोन्ही ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
सचिन मेथे यांच्या एस. कुमार पार्लरचे शटर उचकटले कॅश कॉन्टरमधील पाच, दहा रुपयांचे क्वॉईन चोरट्यांनी पळवले. बालावधूतनगर येथील चंद्रकांत पाटील यांच्या चैतन्य सुपर मार्केट येथून काही साहित्य व ५ हजारांची रोकड लंपास केली.
विठ्ठल पार्क येथील महेश पाटील यांच्या गणेश इलेक्ट्रॉनिक्स येथील १५०० रुपयांची रोकड व चिल्लर चोरट्यांनी गायब केली. याच परिसरातील संजय चौगुले यांच्या बिअर शॉपीमधील सहा हजारांच्या रोख रकमेसह विदेशी मद्याचे बॉक्स चोरून नेला.
सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चोरटे कृष्णात पाटील यांच्या महालक्ष्मी ज्वेलर्सचे शटर उचकटत होते. यावेळी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील व हवालदार पी. एन. जाधव हे गस्ती पथकाची गाडी घेऊन तेथे आले.
पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच कटावणी व इतर साहित्य तिथेच टाकून कच्च्या रस्त्याने चोरटे पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता, ते पसार झाले.
सीसीटीव्हीत चोरटे कैद
विठ्ठल पार्क येथील गणेश इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानमालक महेश पाटील यांनी दुकानाबाहेर सीसीटीव्ही लावले आहेत. पहाटे चारच्या सुमारास चार चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. ३० ते ३५ वयोगटातील या चोरट्यांनी तोंडाला मास्क बांधला होता. हातात ग्लोज घातले होते. या फुटेजवरून चोरट्यांचा माग पोलीस काढत आहेत.