कोल्हापूर : Ganpati Festival गणेशमंडळातील महाप्रसादाचे प्रस्थ वाढतेय... प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाखोंची उलाढाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:25 AM2018-09-20T00:25:32+5:302018-09-20T00:28:03+5:30
गणपती बाप्पा म्हटलं की, मोदक, चिरमुरे, केळी, पेढे यांचा जसा प्रसाद असतो तसाच सोबतीला सत्यनारायणाची पूजा आणि मोठा महाप्रसादही अनेक मंडळांचा ठरलेला असतो
कोल्हापूर : गणपती बाप्पा म्हटलं की, मोदक, चिरमुरे, केळी, पेढे यांचा जसा प्रसाद असतो तसाच सोबतीला सत्यनारायणाची पूजा आणि मोठा महाप्रसादही अनेक मंडळांचा ठरलेला असतो. या माध्यमातूनही लाखो रुपयांची रेलचेल तसेच दानशूर व्यक्तींचे दातृत्व येथे दिसून येते. ही उलाढालदेखील खूप मोठ्या प्रमाणात होत असते. याची शक्यतो कोठेही नोंद येतेच असे नाही.
कित्येक व्यापारी, प्रतिष्ठित लोक, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी, घरगुती मंडळी, तसेच नवस बोलणारे अनेक भाविक हे आपापल्या परीने परिसरातील किंवा जिथे आपली श्रद्धा आहे अशा ठिकाणी महाप्रसादाला सढळ हाताने मदत करीत असतात. यामध्ये अगदी तेलाचा डबा, रवा, शिरा, दूध, तांदूळ, गहू, गोड पदार्थ, साखर, पाण्याच्या बाटल्या, कडधान्य इतकेच नव्हे, तर महाप्रसाद बनविण्यासाठी लागणारे आचारी, हॉल, साहित्य यांचे भाडे देण्यासाठी पुढाकार घेत असतात. याचे स्वरूप काही प्रमाणात देणगी किंवा नाव न घेता केवळ श्रद्धेपोटी देण्याचेही काम करतात. काहीजण तर पूर्णत: महाप्रसादाचा खर्चही देण्याचे आश्वासन पाळतात.
यामध्ये काही प्रतिष्ठित तसेच वर्षानुवर्षे मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सवामध्ये तब्बल चार ते पाच हजार भाविकांना महाप्रसाद देण्याची प्रथा कोल्हापूर नव्हे, तर प्रत्येक शहरात व गावोगावी असल्याचे पाहायला मिळते. अगदी लहानमंडळेही आपापल्या परिसरात भाविकांना महाप्रसाद देण्याचे नियोजन करीत असतात. यामध्येही शिस्त पाळण्याचा प्रयत्न असतो. तसेच महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या भाविकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. प्रसाद देण्याची ही प्रथा असल्याने ही प्रथा कायमस्वरूपी आम्ही पुढे सुरू ठेवणार असल्याचे मंडळातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले.
|