Kolhapur: गारगोटी-कोल्हापूर महामार्ग अखेर सर्व वाहनांना बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 09:24 PM2024-07-25T21:24:17+5:302024-07-25T21:24:29+5:30
Kolhapur Flood News: वेदगंगा नदीच्या महापुराचे पाणी गारगोटी कोल्हापूर महामार्गावरून वाहू लागल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
- शिवाजी सावंत
गारगोटी - वेदगंगा नदीच्या महापुराचे पाणी गारगोटी कोल्हापूर महामार्गावरून वाहू लागल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भुदरगड तालुक्यात जनजीवन विस्कळित झाले आहे.गेले सहा दिवस पूरस्थिती निर्माण झाली आहे परंतु गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस पडल्याने वेदगंगा नदीला महापूर आला आहे.गारगोटी कोल्हापूर महामार्गावर मडीलगे बुद्रुक येथे दुपारपासून महापुराचे पाणी रस्त्यावरून पलीकडे वाहू लागले होते.संध्याकाळी पाण्याची पातळी सतत वाढू लागल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केला आहे.प्रांताधिकारी वसुंधरा बारवे,तहसिलदार डॉ.अर्चना पाटील,पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
तालुक्यात गेल्या चोवीस तासांत ७७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उमळून पडले आहेत.तालुक्यातील पाटगाव धरण ९१.१८ टक्के भरले असून विद्युत निर्मितीसाठी ३०० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.या ठिकाणी गेल्या चोवीस तासांत १२५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. चिकोत्रा मध्यम प्रकल्प ६६.२० टक्के भरला आहे.या परिसरात १९४ मिलिमीटर पाऊस पडला आहे.याशिवाय फये, वासनोली,कोंडूशी,नागणवाडी हे लघु प्रकल्प तुडूंब भरले आहेत.या छोट्या धरणांच्या सांडव्यातुन पाणी वाहत आहे.ओढेनाले दुथडी भरून वाहत आहेत. धुंवाधार पावसामुळे नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे.नदीकाठच्या घरात राहणाऱ्या ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
वाहनचालकांना कोल्हापूर वरून गारगोटी येथे येण्यासाठी कुर येथून म्हसवे मार्गे जाता येईल.अथवा याच मार्गावरील दारवाड मार्गे मिणचे येथून आकुर्डे मार्गे कडगाव कडे जाता येईल