कोल्हापुरनेच दिला कॅमेराचा पहिला अनुभव आणि पुरस्कारही- सचिन पिळगांवकर
By इंदुमती सूर्यवंशी | Published: March 1, 2023 09:00 PM2023-03-01T21:00:17+5:302023-03-01T21:00:24+5:30
सचिन पिळगांवकर यांचा नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्काराने सन्मान
कोल्हापूर: मी तीन वर्षाचा असताना पहिल्यांदा कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रीकरणासाठी आलो. कॅमेरा, सेट पाहून रडायला लागलो आणि रिजेक्ट झालो. त्यानंतर एकदीड वर्षानी याच स्टुडिओत हा माझा मार्ग एकला चित्रपटात बालकलाकाराची भुमिका केली आणि यासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला..रिजेक्शन आणि सिलेक्शन हे दोन्ही पहिले वहिले अनुभव मला कोल्हापुरने दिले. म्हणून कोल्हापूरशी माझे धागे जुळले आहेत..अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी भावना व्यक्त केल्या. निमित्त होते नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्काराचे.
शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमात राजदर्शन दानवे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यानंतर सचिन पिळगांवकर यांनी आपला ६० वर्षांचा हिंदी-मराठी सिनेसृष्टीचा प्रवास उलगडला.
सचिन पिळगावकर म्हणाले, सुर्यकांत मांडरे यांनी मला पहिल्यांदा पाहिले, त्यानंतर माझा सिनेसृष्टीचा प्रवास सुरू झाला. जयशंकर दानवे यांच्या अभिनयाची मी नक्कल करायचो. गुरुदत्त यांना मी गुरूस्थानी मानतो तर मीनाकुमारी यांच्यामुळे मी उर्दु शिकलो. अस्खलित उर्दू बोलू शकत असल्याने कट्यार काळजात घुसली मधील खाँसाहेब मी वठवू शकलो.