कोल्हापूर : ख्रिश्चनांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 01:17 PM2018-12-27T13:17:58+5:302018-12-27T13:18:51+5:30
चंदगड तालुक्यातील कोवाड येथे रविवारी सकाळी प्रार्थना करीत असलेल्या ख्रिश्चन समुदायावर हल्ले करणाऱ्यांना तत्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ख्रिश्चन समुदायातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कोवाड येथील हल्ल्यात बाधित झालेल्या ख्रिश्चन समाजातील ६५ जणांच्या शिष्टमंडळाने दुपारी साडेबाराच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी चर्चा करताना त्यांनी हल्ल्याची दाहकता मांडून न्यायाची मागणी केली.
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील कोवाड येथे रविवारी सकाळी प्रार्थना करीत असलेल्या ख्रिश्चन समुदायावर हल्ले करणाऱ्यांना तत्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ख्रिश्चन समुदायातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
कोवाड येथील हल्ल्यात बाधित झालेल्या ख्रिश्चन समाजातील ६५ जणांच्या शिष्टमंडळाने दुपारी साडेबाराच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी चर्चा करताना त्यांनी हल्ल्याची दाहकता मांडून न्यायाची मागणी केली.
दि. २३ डिसेंबरला सकाळी ११ वाजता प्रार्थना करीत असताना तोंडाला कापड गुंडाळून आलेल्या टोळक्याने अचानक हल्ला चढविला. त्यात सातजण जखमी झाले. त्यांपैकी तिघांना बेळगावमधील केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डोक्याला गंभीर दुखापतीसह फ्रॅक्चर झाले असून, एकाने बोटेही गमावली आहेत. आणखी चौघांना बेळगावमधीलच खासगी आर्थो हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्याच्यावर आॅपरेशन करण्यात येत आहे.
ख्रिश्चन समुदाय शांततेने प्रार्थना करीत असताना अशा प्रकारे हल्ला करून दहशत माजविणे चुकीचे आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असला तरी अजून हल्लेखोरांना अटक झालेली नाही. त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी, अशी ख्रिश्चन समुदायाची मागणी आहे.
निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात डी. डी. धनवडी, सुनील मैदार, संदीप थोरात, संजीवनी बेरड, प्रवीण डावले, सविता डावले, जोएल जाधव यांच्यासह ६५ ख्रिश्चन बांधव सहभागी झाले होते.