कोल्हापूर : शैक्षणिक बदलांचा वेध घेण्यासाठी संस्थेच्या शाखांना भेटी देणार : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:25 PM2018-05-21T13:25:38+5:302018-05-21T13:25:38+5:30
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य फार मोठे आहे. त्यांनी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी आणि शिक्षणप्रसारामुळे समाजातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. बापूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या विविध शाखांना भेटी देऊन शैक्षणिक बदलांचा वेध घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य फार मोठे आहे. त्यांनी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी आणि शिक्षणप्रसारामुळे समाजातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. बापूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या विविध शाखांना भेटी देऊन शैक्षणिक बदलांचा वेध घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, संस्थेच्या विविध शाखांना भेटी देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे अभ्यासक्रम, भौतिक सुविधा, आदींबाबत चर्चा करणार आहे. केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे शाखांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहीन.
या सभेच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महेश हिरेमठ यांनी संस्थेची प्रार्थना, भक्तिगीते सादर केली. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.
यावेळी संस्थेचे सहसचिव प्राचार्य आर. व्ही. शेजवळ, माजी प्राचार्य पी. यू. शेठ यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष संपतराव जेधे, अविनाश पाटील, जी. पी. काका पाटील, शाहीर कुंतीनाथ करके, प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, आदी उपस्थित होते. संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी आभार मानले.
त्या म्हणाल्या, बापूजींनी उभी केलेली ज्ञानभूमी जनसेवेची कर्मभूमी आहे. शिक्षणाच्या प्रसारातून उच्चतम संस्कारमूल्ये जतन करावयाची आहेत. दरम्यान, या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. सन २०१७-१८ च्या अहवाल, आॅडिटेट रिपोर्टस, सन २०१८-१९ च्या एकत्रित जमाखर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. सन २०१८ ते २०२१ या वर्षासाठी नवीन व्यवस्थापक मंडळ, समित्यांची नियुक्ती करून त्यास मंजुरी देण्यात आली. सर्व ठराव एकमताने मंजूर झाले.
कार्याचा वारसा जतन करावा
बापूजींच्या कार्याचा वारसा आपण सर्वांनी जतन केला पाहिजे. अनेक शाळा, महाविद्यालये निर्माण करून विवेकानंद शिक्षण संस्था शैक्षणिक प्रगतिपथावर उभी राहिली. बापूजींच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ही संस्था नवे अभ्यासक्रम, शैक्षणिक धोरणे राबवून शिक्षणात नवे बदल घडवत असते, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
कोल्हापुरात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वार्षिक सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी अविनाश पाटील, आर. व्ही. शेजवळ, अभयकुमार साळुंखे, संपतराव जेधे, शुभांगी गावडे उपस्थित होत्या. (छाया : दीपक जाधव)