कोल्हापूर : सामाजिक स्थित्यंतरे जाणून घेण्यासाठी विद्यापीठांत संशोधन व्हावे : काकोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 03:01 PM2018-10-20T15:01:57+5:302018-10-20T15:24:46+5:30
देशाची सामाजिक, राजकीय वाटचाल भविष्यात कोणत्या मार्गाने होईल, त्याबाबतची आवश्यक स्थित्यंतरे जाणून घेण्याबाबतची चर्चा आणि संशोधन विद्यापीठांमध्ये व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे केले.
कोल्हापूर : देशाची सामाजिक, राजकीय वाटचाल भविष्यात कोणत्या मार्गाने होईल, त्याबाबतची आवश्यक स्थित्यंतरे जाणून घेण्याबाबतची चर्चा आणि संशोधन विद्यापीठांमध्ये व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे केले.
महान शिवचरित्रकार प्राचार्य डॉ. बाळकृष्ण लिखित आणि शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राचे संचालक व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘शिवाजी द ग्रेट’ या चरित्रग्रंथाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषाभवनमधील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर शाहू छत्रपती प्रमुख उपस्थित होते.
ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. काकोडकर म्हणाले, आजची सामाजिक परिस्थिती, लोकतंत्र, राजकीय स्थितीची कारणमीमांसा लावण्यासाठी काही संशोधन झाले असेल. मात्र, देशाची भविष्यातील सामाजिक, राजकीय, आदी क्षेत्रांची वाटचाल कशी राहील आणि प्रगतीबाबतचे योग्य आडाखे बांधणे, तर्क लावणे दिशादर्शक ठरणार आहे. त्या दृष्टीने संशोधनाला विद्यापीठांत चालना मिळावी.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, हा ग्रंथ कोल्हापूरच्या महान परंपरेचा वारसा आहे. शिवचरित्र हाच आजच्या स्थितीतील धर्मग्रंथ आहे. विद्यार्थ्यांनी या ग्रंथाचे वाचन करावे. संशोधकांनी संकुचित विचार सोडून कार्यरत राहावे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार यांनी प्रास्ताविक केले.
शिवाजी विद्यापीठाचे स्वप्न साकारणाऱ्या डॉ. बाळकृष्ण यांचे स्मरण जपण्याच्या उद्देशाने विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये ‘शिवाजी द ग्रेट’ ग्रंथाच्या नव्या आवृत्तीचे काम सुरू केले. डॉ. बाळकृष्ण यांनी साकारलेले हे शिवचरित्र डच, पोर्तुगीज, इंग्लिश, फ्रेंच या भाषांमधील कागदपत्रांवर आधारित आहे. त्यांनी चार खंडांतील ग्रंथाच्या माध्यमातून शिवचरित्र जागतिक पातळीवर नेले. इतिहासाकडे सामाजिक इतिहास म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रा. डॉ. राजन गवस, मेघा पानसरे, मंजूश्री पवार, रणधीर शिंदे, आदी उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी आभार मानले.
विचार रुजविण्याची खरी गरज
या कार्यक्रमात शाहू छत्रपती म्हणाले, ‘शिवाजी द ग्रेट’ हा ग्रंथ छत्रपतींबाबतचा इंग्रजी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. त्यांचे कार्य जागतिक पातळीवरील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा ग्रंथ उपयोगी ठरणारा आहे. आजकाल छत्रपतींचे नाव घेऊन सर्व गोष्टी केल्या जातात. मात्र, त्यांचे विचार रुजविण्याची खरी गरज आहे.