कोल्हापूर : अधिकाधिक शाळा तंबाखूमुक्त करा : शौमिका महाडिक, जनजागृती कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:12 PM2018-11-07T12:12:05+5:302018-11-07T12:16:03+5:30
कोणतेही व्यसन सोडण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मनोनिग्रह महत्त्वाचा असतो. तो टिकविण्यासाठी इतरांचे सहकार्यही अपेक्षित असते. याविषयी जनजागरण करीत जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा, आरोग्य संस्था तंबाखूमुक्त कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.
कोल्हापूर : कोणतेही व्यसन सोडण्यासाठी संबंधित व्यक्तीचा मनोनिग्रह महत्त्वाचा असतो. तो टिकविण्यासाठी इतरांचे सहकार्यही अपेक्षित असते. याविषयी जनजागरण करीत जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा, आरोग्य संस्था तंबाखूमुक्त कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सिगारेट व अन्य तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा (कोटपा) २००३ ची अंमलबजावणी व जनजागृती कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहामध्ये पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला आणि बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील, सभापती मंगल कांबळे उपस्थित होत्या.
शौमिका महाडिक म्हणाल्या, सक्रिय व निष्क्रिय धूम्रपानाविषयी माहिती देऊन निष्क्रिय धूम्रपानाचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबतही जनजागरण आवश्यक आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी प्रास्ताविकामध्ये सर्व विभागांना ‘कोटपा कायदा २००३’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. डॉ. सुरेश घोलप यांनी ‘तंबाखूसेवनाचे मानवी शरीरावरील दुष्परिणाम’ याबाबत माहिती दिली.
कार्यशाळेला अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. यु. जी. कुंभार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा वेदक, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई, जिल्हा परिषद विभागप्रमुख, तालुका गटविकास अधिकारी, आरोग्य समिती सदस्य, पान शॉप असोसिएशन, पोलीस विभाग, हॉटेल ओनर, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, बार असोसिएशन कोल्हापूर, महसूल विभाग, स्वयंसेवी संस्था (एन. जी. ओ.), राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पदाधिकारी, जिल्हा राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.