कोल्हापूर : थेट महामंडळातूनच कर्ज मिळावे, युवक-युवतींची सूचना; मराठा महासंघाचे मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 05:48 PM2018-04-20T17:48:03+5:302018-04-20T17:48:03+5:30
बँकेऐवजी थेट महामंडळातूनच कर्जपुरवठा व्हावा, कागदपत्रांची संख्या कमी करावी, अशा विविध सूचना मराठा समाजातील युवक-युवतींनी शुक्रवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेबाबत केल्या. या महामंडळाच्या कारभाराचे वास्तव मांडणारी वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. यात कर्ज मिळविण्यात युवक-युवतींना येणाऱ्या अडचणीही मांडल्या होत्या. त्यांची दखल घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर शाखेने ‘उद्योगशील मराठा, प्रगतशील मराठा’ हे मार्गदर्शन शिबिर घेतले.
कोल्हापूर : बँकेऐवजी थेट महामंडळातूनच कर्जपुरवठा व्हावा, कागदपत्रांची संख्या कमी करावी, अशा विविध सूचना मराठा समाजातील युवक-युवतींनी शुक्रवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेबाबत केल्या. या महामंडळाच्या कारभाराचे वास्तव मांडणारी वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. यात कर्ज मिळविण्यात युवक-युवतींना येणाऱ्या अडचणीही मांडल्या होत्या. त्यांची दखल घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर शाखेने ‘उद्योगशील मराठा, प्रगतशील मराठा’ हे मार्गदर्शन शिबिर घेतले.
राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक जे. बी. करीम,अग्रणी जिल्हा बँकेचे अधिकारी एस. एस. शिंदे, चार्टर्ड अकौंटंट एस. एस. पोवार, सतीश डकरे, अनिल जाधव, नितीन हरगुडे, उद्योजक उत्तम जाधव यांनी मार्गदर्शन केले. उद्योजक अनंत पाटील, विजय पाटील यांनी अनुभव कथन केले.
यानंतर उपस्थित युवक-युवतींनी बिनव्याजी कर्ज योजनेसाठी आॅनलाईन अर्ज करणे, बँकांकडून कागदपत्रांच्या पूर्तता करताना येणाºया अडचणी मांडल्या. उत्रे (ता. पन्हाळा) येथील पृथ्वीराज पाटील म्हणाले, योजनेसाठीच्या कागदपत्रांची संख्या कमी करावी. अर्ज केल्यानंतर लवकर कर्ज मिळावे.
पारगाव (ता. हातकणंगले)चे मच्छिंद्र पाटील म्हणाले, इतर महामंडळांप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने बँकेऐवजी स्वनिधीतून कर्जपुरवठा करावा. कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत महामंडळाने मदत करावी. शुभांगी घेवडे यांनी या महामंडळाने कर्जपुरवठा करणाºया बँकांची नावे द्यावीत.
आॅनलाईन पोर्टलमध्ये माहिती भरण्यासाठी डेस्क निर्माण करावे, आदी मागण्यांचे पत्र यावेळी मराठा महासंघाला दिले. या मेळाव्यास शिवाजीराव हिलगे, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, शरद साळुंखे, गौरव पाटील, आदी उपस्थित होते. एकनाथ जगदाळे, शिरीष जाधव यांनी स्वागत केले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. अवधूत पाटील यांनी आभार मानले.
मार्गदर्शक म्हणाले
- * संजय शिंदे : या योजना उद्योजकता वाढीला बळ देणाºया आहेत. त्यांची माहिती देण्यासाठी मराठा महासंघाचा उपक्रम चांगला आहे.
- * जे. बी. करीम : या महामंडळाची योजना भावी उद्योजकांना उपयुक्त ठरणारी आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी योग्य प्रकारे अर्ज भरावा. बँकेच्या कागदपत्रांची पूर्तता करावी.
- * उत्तम जाधव : यशस्वी उद्योजक होण्यासाठी जिद्द, कष्ट, संयमाने कार्यरत राहणे आवश्यक आहे.
बँकांच्या प्रतिनिधींसमवेत शनिवारी बैठक
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांची माहिती बँकांना देण्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजता वीरशैव बँकेमध्ये बैठक होणार आहे, असे महामंडळाच्या कोल्हापुरातील समन्वयक शुभांगी जाधव यांनी सांगितले. जाधव यांनी यावेळी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता आॅनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे सादर करणे आदींबाबत मार्गदर्शन केले.