कोल्हापूर : दूधविक्रीवर १० टक्के कमिशन द्या, शहरातील विक्रेत्यांची ‘गोकुळ’कडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:14 PM2018-08-25T12:14:21+5:302018-08-25T12:21:07+5:30
दूध विक्रीच्या दरावर १० टक्क्यांप्रमाणे कमिशन द्या, अशी मागणी कोल्हापूर शहरातील दूध वितरकांनी ‘गोकुळ’च्या प्रशासनाकडे केली. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत वितरकांनी ही मागणी केली.
कोल्हापूर : दूध विक्रीच्या दरावर १० टक्क्यांप्रमाणे कमिशन द्या, अशी मागणी कोल्हापूर शहरातील दूध वितरकांनी ‘गोकुळ’च्या प्रशासनाकडे केली. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत वितरकांनी ही मागणी केली. संघाची सर्वसाधारण सभेनंतर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अध्यक्ष पाटील यांनी दिले.
कोल्हापूर शहरातील म्हैस व गाय दूध विक्रेत्यांना प्रतिलिटर १ रुपया ९० पैसे कमिशन दिले जाते. वाढत्या महागाईमुळे हा व्यवसाय परवडत नसल्याने कमिशनमध्ये वाढ करा. ‘अमूल’ व ‘कृष्णा’ आपल्या वितरकांना प्रतिलिटर तीन रुपये कमिशन देते. त्यामुळे दुधाच्या विक्री किमतीवर १० टक्के कमिशन द्या, तसे लेखी द्या; म्हणजे जसे दुधाचे दर वाढत जातील तसे कमिशन आपोआपच वाढेल, अशी मागणी शिष्टमंडळाने अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे केली.
त्याचबरोबर दर महिन्याला कपात करण्यात येणारी रक्कम दिवाळीला द्यावी, यासह विविध मागण्या वितरकांनी संघाकडे केल्या. यावेळी केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील दूध विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ करता येणार नाही. त्याचा परिणाम मुंबई मार्केटवर होईल. त्यामुळे सध्यातरी कमिशन वाढ करता येणार नाही. संघाची सर्वसाधारण सभा पुढील महिन्यात आहे. त्यानंतर मागणीबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन अध्यक्ष पाटील यांनी दिले.
यावेळी संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, महाव्यवस्थापक आर. सी. शहा, राजेश काळे, धैर्यशील घोरपडे, हणमंत पाटील, सुनील पाटील यांच्यासह शहरातील विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.