कोल्हापूर : रेणुका अंबील यात्रेला नैवेद्यच द्या, पुजाऱ्यांचे आवाहन : शिधा ठेवण्याची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 11:42 AM2018-12-27T11:42:04+5:302018-12-27T11:55:47+5:30
रेणुकामातेच्या येत्या शनिवारी (दि. २९) होणाऱ्या अंबील यात्रेत देवीला भाविकांनी नैवेद्यच द्यावा; त्याऐवजी शिधा देऊ नये. नैवेद्यच देण्याचे माहात्म्य असल्याचे आवाहन रेणुका देवस्थान समितीचे जोगता पुजारी सुनील विलास मेढे यांनी केले आहे.
कोल्हापूर : रेणुकामातेच्या येत्या शनिवारी (दि. २९) होणाऱ्या अंबील यात्रेत देवीला भाविकांनी नैवेद्यच द्यावा; त्याऐवजी शिधा देऊ नये. नैवेद्यच देण्याचे माहात्म्य असल्याचे आवाहन रेणुका देवस्थान समितीचे जोगता पुजारी सुनील विलास मेढे यांनी केले आहे.
दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सौंदत्ती डोंगरावर श्री रेणुकादेवीचा कंकण विमोचन सोहळा होतो. श्री जमदग्नीच्या हत्येनंतर रेणुकादेवीला वैधव्य प्राप्त होते. या विधीसाठी कोल्हापुरातील मानाचे जग सौंदत्ती क्षेत्री जातात. अंबील यात्रेच्या आदल्या दिवशी हे जग परत येतात.
रेणुकादेवीचे तसेच तिच्यासोबत विधवा होऊन आलेल्या तिच्या देवदासींचे, जोगत्यांचे सांत्वन करण्याकरिता रेणुकादेवीचे आवडते अन्नपदार्थ म्हणजे दहीभात, अंबील, वडी-भाकरी, वरण्या-वांग्याची भाजी, मेथीची भाजी हे पदार्थ त्याचबरोबर गाजर, केळी, कांद्याची पात, लिंबू अशा भाज्या व फळे देवीला अर्पण करून तिचे दु:ख हलके करण्याचा प्रघात आहे. त्याचबरोबर या ऋतूत (हिवाळ्यात) नव्याने आलेल्या अन्नपदार्थांचा शरीरालाही उपयोग होतो.
या यात्रेच्या निमित्ताने भाविक देवीच्या दर्शनाला येतात. आणलेल्या नैवेद्याचा सहभोजनाद्वारे आस्वाद घेतात. जमा झालेला नैवेद्यही देवस्थान समिती भक्तांनाच प्रसाद स्वरूपात परत करते. गेली सात वर्षे काटेकोर काळजी घेऊन अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून मंदिर प्रशासन दक्षता घेत आहे; परंतु असे असताना या वर्षीच भाविकांतून नैवेद्याऐवजी शिधा देण्याची चर्चा सुरू झाली आहे.
या यात्रेला प्रचंड संख्येने भाविक येतात. त्यांचा शिधा घेऊन त्याचे करायचे काय, अशी अडचण निर्माण होईल. शिवाय आता आम्ही देवीचा प्रसाद म्हणून जो नैवेद्य परत करतो, तो तसा करता येणार नाही.
शिधा घेऊन त्यातून भात-आमटी भाविकांना शिजवून घालता येईल; परंतु कांदा-पातीसह भाविकांकडून देवीला अर्पण झालेला नैवेद्यच पुन्हा भाविकाला प्रसाद म्हणून परत वाटणे यामध्ये माहात्म्य आहे. ती परंपरा मोडली जाऊ नये म्हणून भाविकांनी नैवेद्यच द्यावा, असे आवाहन पुजारी मेढे यांनी केले आहे.