कोल्हापूर : बांधकाम कामगारांना तीन हजार पेन्शन द्या, कृती समितीतर्फे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:10 PM2018-05-08T17:10:10+5:302018-05-08T17:10:10+5:30
साठ वर्षांवरील बांधकाम कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन सुरू करावी, घरबांधणीसाठी दहा लाख रुपये मिळावेत, बांधकाम कामगारांचे कर्ज माफ करावे, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले.
कोल्हापूर : साठ वर्षांवरील बांधकाम कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन सुरू करावी, घरबांधणीसाठी दहा लाख रुपये मिळावेत, बांधकाम कामगारांचे कर्ज माफ करावे, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले.
बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी १७ फेब्रुवारी २०१८ रोजी कृ ती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु गेल्या तीन महिन्यांत मागण्यांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्याच्या निषेधार्थ समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन सादर केले. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार मंत्र्यांसोबत कृती समितीची तत्काळ बैठक घ्यावी, कामगारांच्या दाखल्यासाठी सर्व ग्रामसेवकांची एकत्रित कृती समितीसोबत बैठक लावावी, मेडिक्लेम योजना पूर्ववत चालू करावी, घरबांधणीसाठी १० लाख रुपये मिळावेत, आचारसंहितेच्या काळात कामगारांची नोंदणी व नूतनीकरण चालू ठेवावे, प्रत्येक दिवाळीला बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान मिळावे, बांधकाम कामगारांचे कर्ज माफ करावे, कामगारांना त्वरित दाखले देण्याचे आदेश द्यावेत, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
आंदोलनात समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे, जोतिराम मोरे, संजय सुतार, लता चव्हाण, के. पी. पाटील, संतोष गायकवाड, अभिजित केकरे, आनंदा गुरव, अमोल कुंभार, आदी सहभागी झाले होते.