कोल्हापूर-गोवा विमानसेवा १९ पासून, धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:39 AM2024-09-05T11:39:02+5:302024-09-05T11:39:24+5:30
काही मिनिटांमध्ये गोव्याला पोहचता येणार
कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेली कोल्हापूर-गोवा ही विमानसेवा येत्या १९ किंवा २० सप्टेंबरला सुरू होणार आहे. यासाठी स्टार एअर कंपनीने वेळापत्रक मागविले असून त्यादृष्टीने प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी या विमानसेवेसाठी पाठपुरावा केला होता. आठवड्यातील दोन दिवस कोल्हापूर-गोवा विमानसेवा सुरू राहणार असून काही मिनिटांमध्ये गोव्याला पोहचता येणार आहे.
कोल्हापुरातून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रस्त्यामार्गे अनेक घाट असल्याने गोव्याला जाण्यास विलंब लागतो. त्यामुळे या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्याअनुषंगाने कोल्हापूर-गोवा ही विमानसेवा सुरू होणार आहे. गोवा-कोल्हापूर आणि कोल्हापूर-हैदराबाद, हैदराबाद-कोल्हापूर आणि कोल्हापूर-गोवा अशी ही दैनंदिन सेवा सुरू करण्यात येणार आहे. स्टार एअर कंपनीकडून ही विमानसेवा चालवली जाणार आहे.
कोल्हापूर-नागपूर २५ पासून सुरू होणार
कोल्हापूर-नागपूर ही विमानसेवा इंडिगो एअरलाईन्सकडून चालविली जाणार असून ती येत्या २५ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाय कोल्हापूर-दिल्ली ही विमानसेवा ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. इंडिगो कंपनीचे सुमारे १८० आसन क्षमतेचे विमान कोल्हापूर - दिल्ली - कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल. कोल्हापूर -अहमदाबाद या विमानसेवेसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.