कोल्हापूर : थर्टी फर्स्टसाठी आणलेले साडेसहा लाखाचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:00 PM2018-12-21T17:00:37+5:302018-12-21T17:04:56+5:30
गोवा बनावटीचे विदेशी मद्यजवळ बाळगल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाने पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून साडेसहा लाखाचे विदेशी मद्य, पाच दूचाकी असा सुमारे आठ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २०) सायंकाळी सावित्रीबाई फुले रुग्णालय परिसर व सानेगुरुजी वसाहत येथे एका घरावर करण्यात आली.
कोल्हापूर : गोवा बनावटीचे विदेशी मद्यजवळ बाळगल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाने पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून साडेसहा लाखाचे विदेशी मद्य, पाच दूचाकी असा सुमारे आठ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २०) सायंकाळी सावित्रीबाई फुले रुग्णालय परिसर व सानेगुरुजी वसाहत येथे एका घरावर करण्यात आली.
संशयित कुलदीप शरद पाटील (वय ३८, रा. शाहूपूरी ई वॉर्ड, कोल्हापूर) , संग्राम पांडूरंग पाटील (२४, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा) व महेश संजय पाटील (२९, रा. जयहिंद स्पोर्टस चौक, क सबा बावडा, कोल्हापूर), सईद अब्दुल्ला गडावाले उर्फ पिंटू, व नागेश दीपक भोसले (पत्ता समजू शकला नाही) अशी पाच जणांची नांवे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सावित्रीबाई फुले रुग्णालयासमोर विनापरवाना गोवा बनावट विदेशी मद्याची देवाण-घेवाण करणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकातील जवान साध्या वेशात थांबले. यावेळी एक जण दूचाकीच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रवासी बँगा अडकवून याठिकाणी आला.
दूचाकीवरील बँगा खाली उतरुन तो तेथे थांबला. थोड्यावेळाने दोन अज्ञात वेगवेगळ्या दूचाकीवरुन त्याच्याजवळ आले. त्या दोघांना एक-एक बॅग देत असताना जवानांनी या अशा एकूण तिघांना रंगेहाथ पकडले. या बॅगेमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या मिळून आल्या.
या विदेशी मद्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सानेगुरुजी वसाहत , देशमुख हायस्कुलच्या पिछाडिस ‘पिंटू ’या व्यक्तिने आपणाला घरातून दिले असल्याचे सांगितले. या तिघांना घेऊन पोलिसांनी त्या घरावर छापा टाकला. या घरासमोर लावण्यात आलेल्या दोन दूचाकीतील कापडी पिशवीत कागदी पुड्याचा बॉक्स होता, त्यामध्ये दोन तर घरामध्ये ७५० मिलिचे मद्याच्या बाटल्या मिळून आल्या.
याप्रकरणी संशयित सईद अब्दुल्ला गडवाले उर्फ पिंटू व नागेश भोसले या दोघांनी हा साठा आपला मालकीचा असल्याची कबुली दिली.या दोघांनी हे घर भाड्याने घेतले होते.याची कल्पना घरमालकांना दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.
या गुन्हया प्रकरणी पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डसचे ७९ कागदी बॉक्स ,पाच दूचाकी असा मुद्देमाल जप्त केला. हे मद्य स्वस्तात गोवा राज्यातून खरेदी करुन आणले होते. ते नववर्षारंभ करिता वितरित करण्यासाठी आणले असल्याचे या संशयितांनी सांगितले.
ही कारवाई जिल्हा अधीक्षक गणेश पाटील व उपअधीक्षक बापुसो चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, के.बी.नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे यांनी केली. तपास बरगे करीत आहेत.