कोल्हापूर : ‘गोकुळ’ची लढाई अजून संपलेली नाही, सतेज पाटील यांचे हाळवणकरांना प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 06:34 PM2018-02-03T18:34:14+5:302018-02-03T18:45:27+5:30
‘गोकुळ’ दूध संघातील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. जोपर्यंत या ठिकाणी काहीजणांनी चालविलेले दुकान बंद करून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुकान सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, हे आमदार सुरेश हाळवणकरांनी लक्षात घ्यावे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे प्रत्युत्तर दिले.
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघातील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. जोपर्यंत या ठिकाणी काहीजणांनी चालविलेले दुकान बंद करून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुकान सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, हे आमदार सुरेश हाळवणकरांनी लक्षात घ्यावे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे प्रत्युत्तर दिले. त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कला महोत्सव घ्यायला वेळ आहे; पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही, अशा शब्दांत त्यांनी टीकाही केली.
कर्जमाफीसंदर्भात आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल रॅली काढून निदर्शने केली. यावेळी ते बोलत होते. भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभात आ. हाळवणकरांनी खासदार धनंजय महाडिक यांना ‘भाजपमध्ये या, मंत्री करू,’ असे निमंत्रण देत ‘गोकुळ’विरोधातील विरोधकांचा आवाज बंद केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते. त्या वक्तव्याचा आमदार सतेज पाटील यांनी यावेळी समाचार घेतला.
‘गोकुळ’मधील भ्रष्टाचाराविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. आम्ही त्याविरोधात सहकार न्यायालयात गेलो असून, तीन महिन्यांत याचा निर्णय झाला नाही तर उच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. ‘गोकुळ’मधील भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी करून पुरावेही सरकारला सादर केले आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर सरकारच्या माध्यमातून आ. हाळवणकरांनी या ठिकाणी प्रशासक नेमावा, असे आव्हानही आ. पाटील यांनी दिले.
पालकमंत्र्यांना कला महोत्सव घ्यायला वेळ आहे; परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही. ज्यांना शेतकऱ्यांबद्दल आत्मीयताच नाही अशी माणसे सत्तेत बसली आहेत; त्यामुळे आपल्याला संघर्षच करावा लागेल, असे आ. पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे. यासाठी एखादी बैठक घ्यावी; परंतु त्यांच्याकडून असे होत नाही. गेल्या काही महिन्यात साखरेचे दर घसरले असून साखर कारखानदार अडचणीत आहेत. त्यासाठी त्यांनी बैठक बोलवावी, अशी मागणी करूनही पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका, आ. पाटील यांनी केली.
आता हाळवणकरही मंत्रिपद वाटायला लागले
यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मंत्रिपद वाटत होते; परंतु आता आ. हाळवणकरही पदे वाटत असून, नंतर महेश जाधवही मंत्रिपदे वाटतील. त्यामुळे भाजपमध्ये आता काही खरे नाही, अशा शब्दांत आ. सतेज पाटील यांनी आ. हाळवणकरांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली.