कोल्हापूर : ‘गोकुळ’ सभेची तारीख बदलणे अशक्यच, सभासदांना नोटीस पोहोचल्याने कायद्याचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 04:10 PM2018-09-15T16:10:07+5:302018-09-15T16:12:44+5:30
‘गोकुळ’च्या सभेचे नोटीस सभासदांना पाठविल्याने आता सभेची तारीख व जागा बदलणे अशक्य आहे. कायदेशीर बाबींचा विचार करता संघाला हा निर्णय घेता येणार नाही. सर्वसाधारण सभेची तारीख बदलायची असल्यास सभेपूर्वी १४ दिवस नोटीस सभासदांना देणे सहकार कायद्यानुसार बंधनकारक आहे.
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या सभेचे नोटीस सभासदांना पाठविल्याने आता सभेची तारीख व जागा बदलणे अशक्य आहे. कायदेशीर बाबींचा विचार करता संघाला हा निर्णय घेता येणार नाही. सर्वसाधारण सभेची तारीख बदलायची असल्यास सभेपूर्वी १४ दिवस नोटीस सभासदांना देणे सहकार कायद्यानुसार बंधनकारक आहे.
‘गोकुळ’ची सभा ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात घेऊ नये, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी दुग्ध विभागासह जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. सभासद संख्येच्या तुलनेत सभेची जागा फारच अरुंद आणि बंदिस्त असल्याने गैरसोईची आहे; त्यामुळे सभासदांना रस्त्यावर उभे रहावे लागते.
सभेचे वातावरण तणावपूर्ण असल्याने सभेवेळी गोंधळ झाल्यास सभासदांना बाहेर पडणे मुश्किल होईल, असेही आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविलेले आहे. त्यातच करवीरच्या संपर्क सभेत विश्वास नेजदार यांना झालेल्या मारहाणीने सर्वसाधारण सभेतील वातावरण चांगलेच गरम झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी नेजदार यांच्या घरी भेट देऊन सभेची जागा बदलण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले.
आता सभेची तारीख बदलण्यात अडचणी आहेत. सहकार कायद्यानुसार संचालक मंडळाच्या सभेसाठी सात दिवस तर सर्वसाधारण सभेसाठी १४ दिवसांचा नोटीस कालावधी असतो. ९७ व्या घटना दुरुस्तीनंतर सप्टेंबर अखेर सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक केले आहे. या महिन्यातील उर्वरित कालावधी पाहता, आता सभेची तारीख बदलणे अशक्यच आहे.
जागा बदलता येऊ शकते?
संपर्क सभेतील अनुभव पाहता पोलीस प्रशासनाने सभेची जागा बदलण्याचे निर्देश दिले तर ‘गोकुळ’ला त्याबद्दल निर्णय घ्यावा लागेल. एखादी जाहीर नोटीस देऊन संघ सभासदांना बदललेल्या जागेबाबत आवाहन करू शकते; पण ‘मल्टिस्टेट’ व ‘सभेची’ जागा हे प्रतिष्ठेचे विषय केल्याने जागेबाबत संचालक मंडळ निर्णय घेतील, असे वाटत नाही.