कोल्हापूर : सोने अपहार प्रकरण : सराफ सन्मुख ढेरेला कोठडी, २६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:42 PM2018-06-19T17:42:16+5:302018-06-19T17:42:16+5:30
कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जातील बनावटगिरीतील फरार झालेल्या संशयित सराफाला पोलिसांनी अटक केली होती. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जातील बनावटगिरीतील फरार झालेल्या संशयित सराफाला पोलिसांनी अटक केली होती. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
संशयित सराफ सन्मुख आनंदराव ढेरे (वय ३५, रा. पिंजार गल्ली, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. संशयितांच्या ताब्यातून सोने किंवा पैसे हस्तगत झालेले नाही. सराफ ढेरे याच्या चौकशीमधून अपहार प्रकारणाचे गुढ बाहेर येणार आहे.
सोने तारण कर्ज प्रकरणात शाखाधिकारी संंभाजी पाटील, कॅशिअर परशराम नाईक व सराफ सन्मुख ढेरे या तिघांनी संगनमताने २७ प्रकरणांत सुमारे १०० तोळ्यांचे बनावट सोने तारण ठेवून सुमारे ३२ लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.
या तिघांनी सोन्याचे दागिन्यांची विल्हेवाट कुठे लावली, त्यातून मिळालेल्या पैसे कुठे गुंतवले याची माहिती अद्यापही पोलीसांच्या हाती लागलेली नाही. सराफ ढेरे हा तपासाच्या दूष्ठीने महत्वाचा होता. तो हाती लागल्याने अपहार प्रकरणातील गुढ बाहेर येणार आहे.
या गुन्ह्यात आणखी काही संशयितांचा हात असण्याची शक्यता आहे, त्या दूष्ठीनेही पोलीस तपास करीत आहेत. आतापर्यंत २६ साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत. बँकेतील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही जबाब घेतले आहेत. तिघेही संशयित तपासामध्ये पोलीसांना सहकार्य करीत नाहीत.
खाकीचा प्रसाद देवून त्यांना बोलते करण्याची तयारी पोलीसांनी केली आहे. या अपहार प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्याचे तपासाकडे लक्ष लागुन राहिले आहे. याप्रकरणी अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत करीत आहेत.