कोल्हापूर : दुचाकीच्या डिक्कीतून १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 03:53 PM2018-08-24T15:53:54+5:302018-08-24T15:57:53+5:30
रुईकर कॉलनी जनता बझारजवळ लॉक करुन असलेल्या दुचाकीच्या डिक्कीमधील १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने , धनादेश, बँकेची दोन पासबुके असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी उघडकीस आली. याबाबत कलाथरन कुमार मेनन यांनी शाहूपुरी पोलिसात रात्री फिर्याद दिली.
कोल्हापूर : रुईकर कॉलनी जनता बझारजवळ लॉक करुन असलेल्या दुचाकीच्या डिक्कीमधील १२ तोळ्याचे सोन्याचे दागिने , धनादेश, बँकेची दोन पासबुके असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. २३) दुपारी उघडकीस आली. याबाबत कलाथरन कुमार मेनन यांनी शाहूपुरी पोलिसात रात्री फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले की, कलाथरन मेनन ह महाडिक वसाहत येथे पत्नीसह राहण्यास आहेत तर मुलगा कैलासनाथ मेनन हा नोकरीनिमित्त त्याच्या पत्नी, मुलासह अहमदाबाद येथे एकत्रित राहतो. कलाथरन यांचा धाकटा भाऊ श्रीनारायणन मेनन यांची मुलगी अंजली यांचे असलेले सोन्याचे दागिने काढण्यासाठी विजयाकुमार मेनन या दुचाकीवरुन लक्ष्मीपुरी येथील एका बँकेत गेल्या.
बँकेतील लॉकरमधील दागिने काढून त्या तेथून राजारामपुरी येथील दुसऱ्या एका बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या. पण; ही बँक बंद असल्याने त्या रुईकर कॉलनी जनता बझार येथे भाजी खरेदीसाठी व किराणा माल दुकानात गेल्या. त्यांनी गणेश ट्रेडर्स दूकानासमोर दुचाकी लॉक केली.
थोड्यावेळाने किराणा सामान व भाजी खरेदी करुन त्या दुचाकीजवळ आल्या. त्यांनी डिक्की उघडली तर डिक्कीतील पिशवीमधील पालका नेकलेस, रुबी नेकलेस, लक्ष्मी हार व लॉकेट असे सोन्याचे दागिने आणि धनादेश, बँकेची दोन पासबुके असा सुमारे तीन लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरट्याने बनावट चावीने किंवा डिक्की उचकटून चोरी केल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.गुरुवारी रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली.
दिवसाढवळ्या घटना ; पोलिस अपयशी
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या रोज घरफोडी, दुचाकी चोरी घटना घडत आहेत. सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.पोलिस हद्दीत गस्त घालतात की नाही, अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे.