कोल्हापूर : ‘अनुलोम’मुळे शासकीय योजना सामान्यांपर्यंत : चंद्रकांत दळवी, पंधरा अधिकारी पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:04 AM2018-01-06T11:04:44+5:302018-01-06T11:08:44+5:30
लोककल्याणासाठी शासनाने केलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना तळागाळांतील घटकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये ‘अनुलोम’ या सामाजिक संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. विविध कार्यक्षेत्रांत काम करणाऱ्या अशा संस्थांनी एकत्र येऊन या कामाचे अनुकरण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले. यावेळी १५ शासकीय अधिकाऱ्यांचा ‘अनुलोम सन्मित्र’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
कोल्हापूर : लोककल्याणासाठी शासनाने केलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना तळागाळांतील घटकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये ‘अनुलोम’ या सामाजिक संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. विविध कार्यक्षेत्रांत काम करणाऱ्या अशा संस्थांनी एकत्र येऊन या कामाचे अनुकरण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले. यावेळी १५ शासकीय अधिकाऱ्यांचा ‘अनुलोम सन्मित्र’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
‘अनुगामी लोकराज्य महाअभियान’ पश्चिम महाराष्ट्र विकास मेळाव्याचे आयोजन राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन दळवी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
दळवी म्हणाले, अशा संस्थांना सहकार्य करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. अशा संस्थांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कामाचा लाभ सर्वसामान्यांना होणे हेच शासनाचे उद्दिष्ट आहे.
धर्मादाय सह.आयुक्त निवेदिता पवार यांनी आपल्या विभागाच्या कामकाजातही यापुढे ‘अनुलोम’चा प्रभावी पद्धतीने वापर करून घेऊ, असे सांगून नागरिकांनी ‘अनुलोम’ अॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फायदा करून घ्यावा, असे आवाहनही केले.
सांगलीचे जिल्हाधिकारी विजयराव काळम-पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात मार्चअखेरपर्यंत १००० हृदयशस्त्रक्रिया करण्याचा संकल्प केला आहे. ‘अनुलोम’च्या सहकार्याने जलयुक्त शिवारमध्येही भरीव काम करण्यात येत आहे.
‘अनुलोम’चे चंद्रकांत पवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, १८ महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या या संस्थेने ७.५० लाख लोकांपर्यंत ‘अनुलोम अॅप’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना पोहोचविल्या.
७५७०० जनसेवक यामध्ये काम करत आहेत. सुमारे २५ हजार लोकांना योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले आहेत. येत्या काळात ५ हजार पाझर तलाव व ७६२ गावतलावातील गाळ काढण्यात येणार आहे.
यावेळी पारस ओसवाल, मुकुंद भावे, पद्माताई कुबेर, प्रशांत कडोले, गिरीष चितळे, विलासराव चौथाई यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या अधिकाऱ्यांचा झाला गौरव
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘अनुलोम सन्मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यामध्ये विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, सांगलीचे जिल्हाधिकारी विजयराव काळम-पाटील, कोल्हापूर कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, इचकरंजीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, तहसीलदार (तासगांव) सुधाकर भोसले, तहसीलदार (माण) सुरेखा माने, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, डॉ. एकनाथ बोधले, साताऱ्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तहसीलदार (अक्कलकोट) दीपक वजाळे, तालुका कृषी अधिकारी (कोरेगाव) सुनील साळुंखे यांचा समावेश होता.
अनुलोम संस्थेच्यावतीने आयोजित विकास मेळाव्याध्ये शुक्रवारी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शंकरराव कुलकर्णी, मुकुंद भावे, चंद्रकांत पवार, पद्माताई कुबेर, प्रशांत कडोले, गिरीष चितळे, विलासराव चौथाई उपस्थित होते.