कोल्हापूर : बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन, व्याख्यान, मिरवणूक-सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 02:01 PM2019-04-13T14:01:23+5:302019-04-13T14:05:16+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना व पक्षांच्या वतीने उद्या, रविवारी व्याख्यान, प्रबोधनपर मिरवणूक अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना व पक्षांच्या वतीने उद्या, रविवारी व्याख्यान, प्रबोधनपर मिरवणूक अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सिद्धार्थनगर येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळी ध्वजारोहण, बाबासाहेबांच्या पुष्पहार अर्पण, बुद्धवंदना आणि विविध क्षेत्रांतील खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कोल्हापूरशी ऋणानुबंध’ या विषयावर व्याख्यान होईल.
दुपारी चार वाजता माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन होईल. यात बारा बलुतेदारांचा सहभाग असणार आहे. तसेच बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विविध चित्ररथ, महाड येथील चवदार तळे, शाहूभक्त गंगाराम कांबळे यांचे हॉटेल, तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेबांचा संविधानाचा पेन, संविधानाचे महत्त्व दर्शविणारा फिरता देखावा, पारंपरिक वाद्यवृंद व भव्य लेसर शो असणार आहे.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनात प्रा. गोपाळ गुरू यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक आधुनिक कैवारी’ या विषयावर ते विवेचन करणार असून अध्यक्षस्थानी प्राचार्य दिनकर खाबडे असतील. ‘फुले-शाहू-आंबेडकर फोरम’तर्फे मनीषानगर येथे सकाळी दहा वाजता शोभा रोकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
त्यानंतर डॉ. प्रकाश पवार यांचे ‘डॉ. आंबेडकरप्रणित भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर तर डॉ. रवींद्र ठाकूर यांचे ‘जोतीराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान होईल.सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र, श्री शिवाजी मराठा फौंडेशन व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानतर्फे सकाळी अकरा वाजता तुपाची विहीर, पावनगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कोल्हापूर शहर मध्यवर्ती समितीच्या वतीने सकाळी ११ वाजता बिंदू चौकात जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तसेच १२८ व्या जयंतीनिमित्ताने १२८ लोकांना संविधान पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार आहे.
चोवीस तास ‘ड्राय डे’ पाळण्यात यावा
बाबासाहेबांचा जयंती दिवस हा २४ तास ड्राय डे करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, या मागणीचे निवेदन आम्रपाली महिला विचार मंचच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांना देण्यात आले. या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेतच ‘ड्राय डे’ असल्याने अनेकजण मद्यपान करून उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे या दिवशी चोवीस तास ड्राय डे पाळला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपाध्यक्षा पूनम बानकर, सुप्रभा चोपडे, प्रिया सरनाईक यांच्यासह महिला उपस्थित होत्या.