कोल्हापूर : ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 05:07 PM2018-09-19T17:07:05+5:302018-09-19T17:15:38+5:30
: ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनी १८ सप्टेंबर रोजी येथील निर्धार संस्था आणि ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
कोल्हापूर : ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनी १८ सप्टेंबर रोजी येथील निर्धार संस्था आणि ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, तसेच ‘अक्षर दालन’चे रवींद्र जोशी यांच्या हस्ते ‘मृत्युंजय’कारांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मेन राजाराम हायस्कूलमध्ये अध्यापन करीत असतानाच सावंत यांनी ‘मृत्युंजय’चे लिखाण सुरू केले. त्यामुळे एका अर्थाने जिल्हा परिषद आणि शिवाजीराव सावंत यांचा वेगळा ऋणानुबंध आहे. त्यामुळेच मेन राजाराम हायस्कूलमध्ये प्रतिवर्षी स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित केला जावा, अशी अपेक्षा यावेळी समीर देशपांडे यांनी व्यक्त केली. यावेळी नारायण बेहेरे, नम्रता बेहेरे, अथर्व देशपांडे, वर्षा चराटे, कोमल पाटील, चंद्रकांत सावंत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
‘प्रायव्हेट’मध्ये विद्यार्थ्यांनी ऐकली ‘मृत्युंजय’कारांची मुलाखत
प्रायव्हेट हायस्कूलमध्ये ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांचा स्मृतिदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. समीक्षक वैजनाथ महाजन यांनी ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांची आकाशवाणीसाठी घेतलेली मुलाखत नववी ‘अ’ च्या विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आली. संजीवनी देशपांडे यांनी यावेळी शिवाजीराव सावंत यांच्याविषयी माहिती सांगितली. कोल्हापुरातील दसरा चौकातील पोलीस कॉलनीमध्येच या कादंबरीचा जन्म झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.