कोल्हापूरचे पालकमंत्री बदलणार?, केसरकरांनीच दिली स्पष्ट कबुली; मुश्रीफांचे नाव आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 11:44 AM2023-09-09T11:44:59+5:302023-09-09T11:46:08+5:30

शेवटचा दौरा असल्याची चर्चा

Kolhapur guardian minister will change?, Kesarkar himself gave a clear confession; Hasan Mushrif name in the forefront | कोल्हापूरचे पालकमंत्री बदलणार?, केसरकरांनीच दिली स्पष्ट कबुली; मुश्रीफांचे नाव आघाडीवर 

कोल्हापूरचे पालकमंत्री बदलणार?, केसरकरांनीच दिली स्पष्ट कबुली; मुश्रीफांचे नाव आघाडीवर 

googlenewsNext

कोल्हापूर : पुढच्या कार्यक्रमावेळी मीच पालकमंत्री असेन किंवा शिक्षणमंत्री असेन का हे माहिती नाही अशी स्पष्ट कबुली पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आणि पालकमंत्री बदलाच्या चर्चेला शुक्रवारी दुपारपासून पुन्हा सुरुवात झाली. केसरकर यांनी शुक्रवार, शनिवारी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये तब्बल १७ कार्यक्रम घेतल्याने त्यांचा या पदावरचा शेवटचा दौरा असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात केसरकर यांनी वरील उद्गार काढले. जरी मी पुढच्या वेळेपर्यंत पालकमंत्री, शिक्षणमंत्री नसलो तरी जिल्हा परिषदवाल्यांना मी जेवण देणार आहे असेही त्यांनी सांगितले. यानंतर कोल्हापूरच्या प्रलंबित पालकमंत्रिपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.

त्याला कारणही तसेच घडले आहे. केसरकर यांनी या दोन दिवसांच्या दौऱ्यात भरगच्च असे कार्यक्रम घेतले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांचे शुक्रवारी भूमिपूजन केले. लोकार्पण सोहळाही केला. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिकेत बैठक घेतली. अंबाबाई, जोतिबा विकासकामांचा आढावा घेतला. यानंतर वडगाव, हातकणंगले, हुपरी नगर परिषदांमध्ये आढावा बैठका ठेवल्या.

आज शनिवारच्या दौऱ्यात त्यांनी सकाळी लवकर भाजपच्या शिष्टमंडळाला वेळ दिली आहे. त्यानंतर कुंथुगिरी, कुंभोज, जयसिंगपूर, शिरोळ नगरपालिकांची आढावा बैठक ठेवली आहे. नृसिंहवाडीला दत्त दर्शन घेऊन ते कुरुंदवाड नगरपालिकेत जाणार आहेत. दुपारनंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत कागल नगर परिषदेत आढावा बैठक घेणार आहेत. एकूण दौरा पाहता महायुतीतील तीनही पक्षांना त्यांनी न्याय देताना सर्वांनाच वेळ दिला आहे. त्यामुळेच त्यांचा हा पालकमंत्री म्हणून शेवटचा दौरा आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हसन मुश्रीफ आघाडीवर

कोल्हापूरच्य पालकमंत्रिपदासाठी हसन मुश्रीफ यांचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद वरिष्ठ पातळीवर गेल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाने पुण्याचे पालकमंत्रिपद भाजपकडेच राहील असे स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूरला मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते. परंतु सध्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता कधीही काहीही होवू शकते यानुसार मुश्रीफ यांची स्वप्नपूर्ती होते की आणखी काही धक्कादायक निर्णय होतो हे लवकरच कळणार आहे.

शासकीय विश्रामगृहावरही अधिकाऱ्यांची लगबग

केसरकर यांच्या या दौऱ्यात शासकीय अधिकाऱ्यांची सुरू असलेली लगबग नेहमीची नसल्याचे सांगण्यात येते. जिल्हा नियोजन समितीकडील काही तटलेली कामे मार्गी लावण्यासाठीही या दौऱ्यात खास वेळ ठेवण्यात आला असून, तशा हालचाली शासकीय विश्रामगृहावर दिसून येत आहेत.

Web Title: Kolhapur guardian minister will change?, Kesarkar himself gave a clear confession; Hasan Mushrif name in the forefront

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.