कोल्हापूर : ‘राजर्षी शाहूं’चा ‘भारतरत्न’ पंतप्रधानांच्या हातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:01 PM2018-07-28T12:01:39+5:302018-07-28T12:06:25+5:30
आपल्या छोट्याशा संस्थानांत इंग्रज राजवटीचा जाच असतानाही सामाजिक परिवर्तनाचे उत्तुंग कार्य करणाऱ्या व १९०२ साली ५० टक्के मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचा पहिला जाहीरनामा काढणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
विश्र्वास पाटील
कोल्हापूर : आपल्या छोट्याशा संस्थानांत इंग्रज राजवटीचा जाच असतानाही सामाजिक परिवर्तनाचे उत्तुंग कार्य करणाऱ्या व १९०२ साली ५० टक्के मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचा पहिला जाहीरनामा काढणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शाहूंच्या कार्याची थोरवी देशभर पोहोचावी व त्यांच्या कार्याला अधिमान्यता मिळावी, यासाठी तसा विचार पुढे आला आहे; परंतु कुणाला ‘भारतरत्न’ द्यावा, याचा निर्णय पंतप्रधान कार्यालय घेत असल्याने हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आहे.
देशात व राज्यातही भाजपचेच सरकार असल्याने महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पंतप्रधानांकडे राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पुढे आली आहे. महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनाही हा सन्मान मिळावा, अशी मागणी यापूर्वीच झाली आहे.
महाराष्ट्रात गेल्या वर्षी सकल मराठा समाजाचे मूक मोर्चे सुरू झाले तेव्हा ‘शाहू महाराजांना भारतरत्न’ ही त्या मोर्चातील एक प्रमुख मागणी होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत त्या विषयाला पुन्हा तोंड फोडले.
हा सर्वोच्च सन्मान देण्याची कार्यपद्धती काय असते, यासंबंधीची चौकशी ‘लोकमत’ने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली. हा सन्मान कुणाला द्यावा, यासंबंधीची मागणी व्यक्ती, संघटना, संस्था यांपैकी कोणीही केंद्र सरकारकडे करू शकते.
मागणी न करताही केंद्र सरकार स्वत:हून हा पुरस्कार देऊ शकते; परंतु त्याची निवड करण्याचे काम पंतप्रधान कार्यालयामार्फतच होते. त्यांनी निवड केलेल्या व्यक्तीची घोषणा राष्ट्रपती कार्यालयाकडून होते व प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्तेच त्याचे वितरण होते. पद्म पुरस्कारांची निवड मात्र गृह मंत्रालयाच्या पातळीवर होते. त्यासाठी या मंत्रालयाची तज्ज्ञ समिती आहे.
‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च सन्मान असून, तो २ जानेवारी १९५४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी द्यायला सुरू केला. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पहिला ‘भारतरत्न’ सन्मान देऊन गौरविण्यात आले. आतापर्यंत देशातील ४५ मान्यवरांना हा सर्वोच्च सन्मान बहाल करण्यात आला आहे. त्यांतील १३ व्यक्तींना तो मरणोत्तर देण्यात आला आहे. एका वर्षात किमान तीन व्यक्तींना तो देता येतो, असे संकेत आहेत.
यांचा झाला गौरव...
आतापर्यंत या सन्मानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मदर तेरेसा, विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, नेल्सन मंडेला, जेआरडी टाटा, मोरारजी देसाई, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, जयप्रकाश नारायण, भीमसेन जोशी, अमर्त्य सेन, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, अटलबिहारी वाजपेयी, आदी मान्यवरांचा गौरव झाला आहे.
खरे म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील काम हे ‘भारतरत्न’ पुरस्काराहूनही मोठे आहे. त्यांनी घालून दिलेली अनेक सूत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेत समाविष्ट केली. आरक्षणाचा प्रेरणास्रोतच राजर्षी शाहू महाराज होते. त्यांचे हे काम देशपातळीवर जावे यासाठी त्यांना व महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार दिला जावा; कारण ही दोन्ही बहुजनांची दैवतेच आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पुढाकार घ्या.
- डॉ. जयसिंगराव पवार
ज्येष्ठ इतिहास संशोधक