Kolhapur: तरण्याला लागेना जोर, शेतकऱ्यांना पडला घोर; धरणक्षेत्रातही पाऊस कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 01:22 PM2023-07-13T13:22:07+5:302023-07-13T13:22:24+5:30
कोल्हापूर : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. ऐन पुर्नवस्यर्क (तरणा) नक्षत्रात आकाश पांढरे शुभ्र झाल्याने शेतकऱ्यांची ...
कोल्हापूर : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. ऐन पुर्नवस्यर्क (तरणा) नक्षत्रात आकाश पांढरे शुभ्र झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाला असून नद्यांची पाणीपातळी एकदम कमी झाली आहे.
यंदा, माॅन्सून उशिरा सुरू झाला आणि आठ-दहा दिवस पाऊस राहिला. माॅन्सूनच्या चार महिन्यांत पुनर्वस्यर्क (तरणा पाऊस) व पुष्येर्क (म्हातारा पाऊस) ही दोन नक्षत्र काळात जोरदार पाऊस कोसळतो. तरणा पाऊस ६ जुलै रोजी सुरू झाला आहे, वाहन गाढव असून हे नक्षत्र सुरू झाल्यापासून पाऊस कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून खडखडीत ऊन पडत आहे. त्यामुळे आणखी चिंता वाढली आहे. अद्याप जमिनीत पाणी झालेले नाही. त्यामुळे भात व नागलीच्या रोपलागणी खोळंबल्या आहेत.
तरणा पाऊस आणखी आठ दिवस राहिला आहे. २० जुलैला सूर्य पुष्येर्क नक्षत्रात प्रवेश करत आहे. वाहन बेडूक असून या कालावधीत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, बुधवारी पावसाने उसंत घेतल्याने पंचगंगेची पातळी १४.४ फुटांपर्यंत खाली आली आहे. रुई, इचलकरंजी हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत.
किडीला पोषक वातावरण
सध्या पाऊस कमी झाला असून ढगाळ व ऊन असे वातावरण राहिले आहे. हे किडीला पोषक असून भुईमूग, सोयाबीन, भात व वेलवर्गीय पिकांना याचा फटका बसू शकतो.