कोल्हापुरात तीन महिन्यांतील सर्वाधिक कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 02:31 PM2021-03-19T14:31:00+5:302021-03-19T14:32:36+5:30
CoronaVirus Kolhapur- गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या कोल्हापुरात गुरुवारी नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ६२ रुग्ण नोंदले गेले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील २७, तर अन्य जिल्ह्यांतील १६ रुग्णांचा समावेश आहे.
कोल्हापूर : गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या कोल्हापुरात गुरुवारी नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ६२ रुग्ण नोंदले गेले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील २७, तर अन्य जिल्ह्यांतील १६ रुग्णांचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर दक्षता घ्यावी लागणार आहे. कणकवली तालुक्यातील ७८ वर्षांच्या महिलेचा, तर कागल तालुक्यातील व्हनाळी येथील ६७ वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
डिसेंबर २०२०पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. त्यानंतरच्या तीन महिन्यांत ती ५ पासून २५ पर्यंत अशी येत होती. मात्र गेल्या चार दिवसांत टप्प्याटप्याने ही संख्या वाढू लागली आहे.
गुरुवारी, तर ६२ रुग्ण नोंदविण्यात आल्याने वैद्यकीय अधिकारीही काळजीत पडले आहेत. एकीकडे दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असतानाच जिल्ह्यात तीन महिन्यांनंतर ५० हून अधिक पाच रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
भुदरगड तालुक्यात एक, करवीर तालुक्यात ११, पन्हाळा तालुक्यात एक, शाहूवाडी तालुक्यात एक, नगरपालिका क्षेत्रात पाच रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरामध्ये ३७६ जणांची तपासणी करण्यात आली असून, १,३५४ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १४३ जणांची ॲन्टिजेन टेस्ट घेण्यात आली असून, ३७४ जणांवर उपचार सुरू आहेत.
- आतापर्यंतचे कोरोनाचे एकूण रुग्ण ५१ हजार ०६३
- डिस्चार्ज झालेले रुग्ण ४८ हजार ९३५
- आतापर्यंतचे मृत्यू १७५४
- सध्या उपचार घेत असलेले रुग्ण ३७४