कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये ११ पर्यंत २५ टक्के मतदान, ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:32 PM2019-04-23T12:32:28+5:302019-04-23T13:29:41+5:30
उत्साही वातावरणात कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतील मतदानाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. शहरासह ग्रामीण भागातील केंद्रांवर मतदारांचा रांगा लागल्या होत्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी २५ टक्के मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरु राहिली.
कोल्हापूर : उत्साही वातावरणात कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतील मतदानाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. शहरासह ग्रामीण भागातील केंद्रांवर मतदारांचा रांगा लागल्या होत्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी २५ टक्के मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरु राहिली.
गेल्या वीस दिवसांपासून कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात राष्ट्रवादी-काँग्रेस, शिवसेना-भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आदींमध्ये चुरशीने प्रचाराची रणधुमाळी रंगली. पदयात्रा, जाहीर सभा-मेळावे, रॅलीसह सोशल मिडियांवरुन प्रचार सुरु होता. तिसऱ्या टप्प्याअंतर्गत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात मंगळवारी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.
पावणेसात वाजल्यापासून शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर मतदारांचा रांगा लागल्या.आठनंतर केंद्रांवरील गर्दी वाढली. कॉलनी, अपार्टमेंटमधील अनेकजण एकत्रितपणे मतदानासाठी येत होते. केंद्रांवर महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २५ टक्के मतदान झाले. उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी मतदान करण्याकडे अनेकांचा कल राहिला.
मतदान केंद्रांबाहेर उमेदवारांच्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक थांबून होते. केंद्राच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. मतदान असल्याने शहर, उपनगरांतील बाजारपेठा, रस्त्यांवर शांतता दिसून आली.
‘आमचं ठरलयं’ आधी
कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघातील अनेक केंद्रांवर शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे बूथ फारसे दिसले नाहीत. परंतु सकाळी सात वाजल्यापासून ‘आमचं ठरलयं’ असे लिहिलेल्या टोप्या घालून कार्यकर्ते केंद्रांबाहेर थांबले होते. मतदानासाठी ते आवाहन करत होते.
मतदानासाठी उत्तम व्यवस्था
ग्रामीण भागातील केंद्रांबाहेर मतदान केंद्रांबाहेर ग्रामपंचायतींनी मंडप उभारले होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांसाठी वाहनाची व्यवस्था केली होती. मतदान केंद्राच्या परिसरातील मदत कक्ष अनेकांसाठी उपयोगी ठरला. मतदान कक्ष आणि अन्य माहिती त्याठिकाणी जावून नागरिक घेत होते.
केंद्र परिसरात मोबाईलला बंदी
मतदान केंद्र परिसरात मोबाईल, कॉर्डलेस फोन, वायरलेस घेवून जाण्यास बंदी होती. त्याबाबत पोलिसांंकडून मतदारांना सूचना देण्यात येत होत्या.
सकाळी सात ते नऊपर्यंतची मतदानाची आकडेवारी
कोल्हापूर मतदारसंघ
चंदगड : ८.२१ टक्के
राधानगरी : १०.२७ टक्के
कागल : ९.९७ टक्के
कोल्हापूर दक्षिण : १०.१९ टक्के
करवीर : १०.२५ टक्के
कोल्हापूर उत्तर : ९.६८ टक्के
हातकणंगले मतदार संघ
शाहूवाडी : ९.३१ टक्के
हातकणंगले : ९.४८ टक्के
इचलकरंजी : ९.२७ टक्के
शिरोळ : ९.२३ टक्के
इस्लामपूर : ७.३१ टक्के
शिराळा : ७.४० टक्के
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
क्षेत्र टक्केवारी
- शाहूवाडी : 23.00%
- हातकणंगले : 25.50%
- इंचलकरंजी : 24.50%
- शिरोळ : 22.70%
- इस्लामपूर : 21.50%
- शिराळा : 20.50%
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
क्षेत्र टक्केवारी
- चंदगड : 19.96%
- राधानगरी : 26.50%
- कागल : 26.24%
- कोल्हापूर दक्षिण : 24.87%
- करवीर : 25.50%
- कोल्हापूर उत्तर : 24.66%