LokSabha2024: कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी बारापर्यंत निकालाचा गुलाल शक्य, प्रशासनाची तयारी पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 11:55 AM2024-05-29T11:55:48+5:302024-05-29T11:57:25+5:30

मतमोजणी आणि फेऱ्या किती होणार..जाणून घ्या

Kolhapur, Hatkanangle The results of the Lok Sabha constituencies will be declared by 12 noon | LokSabha2024: कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी बारापर्यंत निकालाचा गुलाल शक्य, प्रशासनाची तयारी पूर्ण 

कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील मतमोजणी केंद्रांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाहणी केली

कोल्हापूर : जिल्ह्यात अत्यंत चुरशीने पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि.४ जून) होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांसाठी १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोन्ही मतदारसंघांच्या मतमोजणी ठिकाणांना मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन कक्षातील टेबलची रचना, उमेदवार प्रतिनिधी आसन व्यवस्था, सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी ठिकाणी येण्या-जाण्याचे मार्ग याचा आढावा घेतला.

कोल्हापूर मतदारसंघातील मतमाेजणी रमणमळ्यातील शासकीय धान्य गोडाऊन व हातकणंगले मतदारसंघातील मतमोजणी राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम इमारत येथे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.

६८६ कर्मचारी करणार मतमोजणी

मतमोजणीसाठी कोल्हापूर मतदारसंघासाठी ३४९ तर हातकणंगले मतदारसंघासाठी ३३७ असे एकूण ६८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त १० टक्के कर्मचारी दोन्ही ठिकाणी राखीव असतील. तसेच दोन्ही मतदारसंघांसाठी प्रत्येकी ६०० असे १२०० पोलिस बंदोबस्तासाठी असतील.

मतमोजणी आणि फेऱ्या अशा

मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. पोस्टलनंतर ईव्हीएमवरील मतमोजणी साडेआठ वाजता सुरू होईल.
कोल्हापूर : सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी होईल.
फेऱ्या : चंदगड २८, राधानगरी ३१, कागल २६, कोल्हापूर दक्षिण २४, करवीर २६ आणि कोल्हापूर उत्तर- २३ फेऱ्या

हातकणंगले : १४ मतमोजणी टेबल
फेऱ्या : शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी २४, इचलकरंजी १९, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी २१ तर शिरोळसाठी २४ फेऱ्या

नियुक्त कर्मचारी

दोन्ही लाेकसभा मतदारसंघासाठी प्रत्येक टेबलसाठी एक मतमोजणी प्रतिनिधी. टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र प्रतिनिधी असेल. टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहायक, एक शिपाई, एक सूक्ष्म निरीक्षक असेल. ईव्हीएम व टपाली मतमोजणीनंतर आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी केली जाईल. कर्मचाऱ्यांना मतमोजणी केंद्रावर मोबाईल, कॅमेरा, ऑडिओ व्हिडीओ रेकॉर्डर- पेन अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई आहे.

मतमोजणीच्या ठिकाणच्या सुविधा

मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक, उमेदवार व निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था, पुरेसा वीज पुरवठा व जनरेटर बॅकअप, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा असणार आहे. सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक सुविधा यंत्रणा, पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, जेवणाची तसेच स्वच्छतागृह, प्राथमिक वैद्यकीय सेवा असतील.

Web Title: Kolhapur, Hatkanangle The results of the Lok Sabha constituencies will be declared by 12 noon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.