कोल्हापूर : होमिओपॅथीलाही लागू होणार आरोग्य विमा : श्रीपाद नाईक यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:45 PM2018-05-11T15:45:12+5:302018-05-11T15:45:12+5:30
होमिओपॅथीसाठी आरोग्य विमा लागू करण्यासाठी विमा कंपन्यांसोबत बैठक झाली असून येत्या वर्षभरात हा प्रश्न निकालात काढू, अशी ग्वाही केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे दिली.
कोल्हापूर : होमिओपॅथीसाठी आरोग्य विमा लागू करण्यासाठी विमा कंपन्यांसोबत बैठक झाली असून येत्या वर्षभरात हा प्रश्न निकालात काढू, अशी ग्वाही केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे दिली.
कावळा नाका येथील मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च आणि ट्रीटमेंट सेंटरच्या वास्तू स्थलांतर सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या.
प्रमुख उपस्थिती आ. डॉ. सुजित मिणचेकर, आ. चंद्रदीप नरके, ‘मॉडर्न होमिओपॅथी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार माने, व्यवस्थापकीय संचालक प्रेमकुमार माने, महाराष्ट्र कौन्सिल आॅफ होमिओपॅथीचे उपाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. अजय ताडे (पुणे), डॉ. विकास मोहिते (कऱ्हाड ) आदींची होती.
मंत्री नाईक यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या वास्तूचे उद्घाटन व कोनशिला अनावरण झाले.
मंत्री नाईक म्हणाले, होमिओपॅथी रिसर्च सेंटरचे डॉ. विजयकुमार माने यांनी वीस वर्षापूर्वी लावलेल्या या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. होमिओपॅथी गावागावात पोहोचविण्याचे काम डॉक्टरांनी केले आहे. भारतात जितके होमिओपॅथीवर विश्वास ठेवून लोक उपचार घेतात त्यातुलनेत जगात इतर ठिकाणी हे प्रमाण कमी आहे.
सामान्य माणसाला शस्त्रक्रीया परवडत नाही, परंतु होमिओपॅथीच्या माध्यमातून विनाशस्त्रक्रीया व कमी खर्चात उपचार केले जातात हे कौतुकास्पद आहे. रोगाला मूळासकट उखडून टाकण्याची ताकद या पॅथीमध्ये आहे.
महापौर यवुलजे यांनी ‘मॉडर्न होमिओपॅथी’च्या माध्यमातून कोल्हापूरचे नाव देशपातळीवर नेल्याबद्दल डॉ. माने यांचे कौतुक केले.
आ. मिणचेकर यांनी होमिओपॅथीसाठी सरकारने किमान ५० टक्के अनुदान देण्याची मागणी केली.
प्रास्ताविकात डॉ. विजयकुमार माने म्हणाले, होमिओपॅथीच्या माध्यमातून केलेले संशोधन तळागाळात पोहोचविण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्याचबरोर ‘मॉडर्न होमिओपॅथी’च्या माध्यमातून देशभरात शिबिरे घेतली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होमिओपॅथीला विशेष महत्व दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहे.
यावेळी विमल माने, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. गिरीष कोरे, डॉ. श्रीधर पाटील, डॉ. शिरिष पाटील, डॉ. संदीप पाटील आदी उपस्थित होते. प्रेमकुमार माने यांनी आभार मानले.