कोल्हापूर तापले--तापमान ४१ अंश सेल्सिअसवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 06:23 PM2019-04-11T18:23:26+5:302019-04-11T18:25:04+5:30
अवघ्या ११ दिवसांवर आलेल्या मतदानासाठी प्रचाराचा पारा टिपेला पोहोचला असतानाच आता उन्हाच्या तीव्र झळांनी त्यात भर टाकल्याने कोल्हापूरची हवा तापली आहे. वातावरणातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्याही पुढे सरकू लागल्याने
कोल्हापूर : अवघ्या ११ दिवसांवर आलेल्या मतदानासाठी प्रचाराचा पारा टिपेला पोहोचला असतानाच आता उन्हाच्या तीव्र झळांनी त्यात भर टाकल्याने कोल्हापूरची हवा तापली आहे. वातावरणातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्याही पुढे सरकू लागल्याने प्रचारक आणि सर्वसामान्य नागरिकही घामाघूम झाले आहेत. तीव्र झळांनी अंगाला चटके बसत असतानाही कार्यकर्ते उमेदवारांसमवेत प्रचारासाठी दारोदार भटकताना दिसत आहेत.
कोल्हापुरात आजवर सर्वोच्च ४१ अंश सेल्सिअस तापमान गेल्यावर्षी मे महिन्यात नोंदवले गेले होते; पण आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उष्णतेचा कहर अनुभवण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. गुरुवारी सकाळी ३९ अंश सेल्सिअस असणारे तापमान दुपारी एकच्या सुमारास ४१ वर पोहोचले. चारनंतर पुन्हा ३९ वर आले. कडक उन्हाच्या झळांनी कासावीस झालेले जीव गारव्याच्या शोधात आहेत. दुपारी १२ ते ३ या वेळेत तर उन्हात एक मिनिटही उभे राहू शकत नाही, इतकी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. तीव्र झळांनी अंगाची लाही लाही होत आहे.
अशा स्थितीतही प्रचाराचा धडाका सुरूच आहे. २३ ला होणाºया मतदानासाठी २१ रोजीच जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे; त्यामुळे अवघे १0 दिवसच प्रचारासाठी राहिले आहेत. मुळातच कोल्हापूरच्या दोन्ही लढती हाय व्होल्टेज असल्याने उन्हातान्हाची पर्वा न करताच उमेदवार, कार्यकर्ते प्रचारासाठी सकाळी आठ वाजल्यापासून प्रचारासाठी बाहेर पडत आहेत. ऊन जास्त असल्याने गर्दी जमवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकल्याने सकाळी ११ पर्यंत पदयात्रा पूर्ण करून, त्यानंतर कोपरा सभा घेण्याचे आणि रात्रीच्या वेळेस जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे.