कोल्हापूर तापले, पारा ३९ अंशावर
By संदीप आडनाईक | Published: April 4, 2024 04:12 PM2024-04-04T16:12:40+5:302024-04-04T16:13:03+5:30
उकाड्यात होणार वाढ
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा पारा हळूहळू चढू लागलेला असतानाच आता उन्हाच्या तीव्र झळांनी त्यात भर टाकली आहे त्यामुळे कोल्हापूरचा पारा गुरुवारी ३९ अंश इतका तापला आहे. वातावरणातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पुढे सरकू लागल्याने प्रचारक आणि नागरिकही घामाघूम झाले आहेत. तीव्र झळांनी अंगाला चटके बसत असतानाही कार्यकर्ते उमेदवारांसमवेत प्रचारासाठी दारोदार फिरताना दिसत आहेत.
कोल्हापुरात आजवर सर्वोच्च ४१ अंश सेल्सिअस तापमान गेल्यावर्षी मे महिन्यात नोंदवले गेले होते; पण यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उष्णतेचा कहर अनुभवण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजता ३८.७अंश सेल्सिअस असणारे तापमान दुपारी एकच्या सुमारास ३९ अंशावर पोहोचले आणि चारनंतर पुन्हा ३८ अंशावर आले.
गेल्या आठवड्यात कोल्हापुरचा पारा तब्बल २.१ अंश सेल्सिअसने वाढता राहिला आहे, या आठवड्यात तो २.३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा अनुमान हवामानतज्ञांनी व्यक्त केला आहे. कडक उन्हाच्या झळांनी कासावीस झालेले जीव गारव्याच्या शोधात आहेत. भर दुपारी तीव्र झळांनी अंगाची लाही लाही होत आहे.
कमाल तापमान जाणार ४० अंशावर
दिवसाची उष्णता वाढू लागली आहे. गुरुवारपासून सर्वच जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानाच्या ९५ व्या टक्केवारीनुसार कमाल तापमान नोंदवणाऱ्या एकुण सर्व केंद्रापैकी ९५ टक्के केंद्रांवर दुपारचे किमान पातळीवरील ४० डिग्री सेल्सिअस ग्रेड कमाल तापमानापेक्षा अधिक म्हणजे दुपारचे कमाल तापमान ४१ ते ४२ सेल्सिअस ग्रेड जाणवणार आहे.
उकाड्यात होणार वाढ
दरम्यानच्या काळात पहाटेचे किमान तापमानही सरासरी किमान तापमानापेक्षा २ डिग्री सेल्सिअसने अधिक जाणवणार आहे. उष्णतेच्या काहिलीबरोबरच रात्रीचा उकाडाही चांगलाच जाणवू शकेल असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.