‘सेवार्थ’मध्ये राज्यात कोल्हापूर भारी
By Admin | Published: November 15, 2015 10:42 PM2015-11-15T22:42:35+5:302015-11-15T23:52:27+5:30
पहिल्या क्रमांकावर : डिसेंबरपासून आॅनलाईन पगार वेळेत
भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या पंचायत राज सेवार्थ प्रणालीत कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात भारी ठरली आहे. जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या ९९ टक्के विभागांतील कर्मचाऱ्यांची माहिती ‘सेवार्थ’ अंतर्गत आॅनलाईन भरण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्याचा पगार डिसेंबरपासून सर्व कर्मचाऱ्यांचा आॅनलाईन बँक खात्यावर जमा होणार आहे. यामुळे खातेप्रमुख सतर्क राहिल्यास प्रत्येक महिन्याला एक तारखेला कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार जमा होणार आहे.
सर्व विभागांकडून पगारपत्रक तयार करणे, विभागप्रमुखांकडून ते वित्त विभागाकडे येणे, त्यानंतर ट्रेझरी कार्यालयाला जाणे अशी पगार जमा होण्याची पारंपरिक पद्धती आहे. मनुष्यबळाद्वारे ही पद्धती राबविली जाते. त्यामुळे पगारपत्रक तयार करताना अनवधानाने चूक झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यास आर्थिक फटका बसतो. पगारपत्रक तयार करणारा नेहमीचा अनुभवी कर्मचारी नसेल तर अडचण येते. वेळेवर पगार ट्रेझरीमध्ये जमा होत नाही. परिणामी पगार वेळेवर होत नाही.
आॅफलाईन पद्धती असल्यामुळे पगारापोटी त्या-त्या महिन्यात किती पैसे लागणार, हे शासनाच्या वित्त विभागाला नेमकेपणाने कळत नाही. त्यामुळे पगारासाठी म्हणून लाखो रुपये बाजूला काढून ठेवावे लागतात. या सर्व त्रुटी दूर व्हाव्यात, प्रत्येक कर्मचाऱ्याला वेळेत पगार मिळावा, यासाठी शासनाने सेवार्थ प्रणाली राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना एप्रिलपासून सुरू केली. कोल्हापूर जिल्हा परिषदेने ही प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुका पातळीवर अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेतले. आॅनलाईन माहिती भरण्याची जबाबदारी निश्चित केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य लेखाधिकारी गणेश देशपांडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे राज्यात या प्रणालीच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा परिषद पहिल्या क्रमांकावर आहे. ‘सेवार्थ’मुळे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बँक खात्यावर पगार जमा होणार आहे. प्रणालीतील कर्मचारीनिहाय विविध भत्त्यांसह पगाराची माहिती अद्ययावत असल्यामुळे प्रत्येक महिन्याला एका क्लिकवर पगारपत्रक तयार करता येणार आहे. आॅनलाईन असल्यामुळे वित्त विभाग थेट संंबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर पगार जमा करणार आहे.
व्यापक नियोजन केल्यामुळे सेवार्थ प्रणालीत माहिती भरण्यात कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. नोव्हेंबरचा पगार डिसेंबरला या प्रणालीद्वारे आॅनलाईन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
- गणेश देशपांडे, मुख्य लेखाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर
सात जिल्हे प्रायोगिक तत्त्वावर
‘सेवार्थ’मध्ये चांगले काम केलेल्या जालना, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, औरंगाबाद या सात जिल्ह्यांची निवड ‘प्रायोगिक’साठी केली आहे. सात जिल्ह्यातही कोल्हापूर जिल्हा परिषदेने पहिला क्रमांक कायम राखला आहे. नोव्हेंबरचा पगार डिसेंबरमध्ये आॅनलाईन पद्धतीने सात जिल्ह्यात सर्वप्रथम कोल्हापूरच काढणार आहे. सात जिल्ह्यात प्रणाली यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये ती लागू करण्यात येणार आहे.