कोल्हापूर :भुयेतील अपंग बहिणींसाठी मदत सुरू, व्हीलचेअर, वॉकर, भांडी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 02:52 PM2018-05-21T14:52:37+5:302018-05-21T14:52:37+5:30
भुये (ता. करवीर) येथील पुतळा आणि वैजयंती कांबळे या दोघा अपंग बहिणींसाठी समाजातून मदतीचे हात अजूनही पुढे येत आहेत. रविवारी ‘गरजूंना मदत करूया’ (गमक) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बहिणींची भेट घेऊन, त्यांना एक व्हीलचेअर, वॉकर, घरगुती भांडी, साडी-चोळी व शाल भेट देऊन त्यांच्या दु:ख हलके केले.
कोल्हापूर : भुये (ता. करवीर) येथील पुतळा आणि वैजयंती कांबळे या दोघा अपंग बहिणींसाठी समाजातून मदतीचे हात अजूनही पुढे येत आहेत. रविवारी ‘गरजूंना मदत करूया’ (गमक) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बहिणींची भेट घेऊन, त्यांना एक व्हीलचेअर, वॉकर, घरगुती भांडी, साडी-चोळी व शाल भेट देऊन त्यांच्या दु:ख हलके केले.
‘लोकमत’मध्ये ‘भुयेतील अपंग बहिणींबाबत नियती निष्ठुर’ या मथळ्याखाली जगण्याचा संघर्ष करणाऱ्या पुतळा व वैजयंती कांबळे या दोघा अपंग बहिणींचे वास्तव मांडले होते. या वृत्ताची दखल घेऊन समाजातील दानशूर व्यक्ती पुढाकार घेऊन या बहिणींचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
रविवारी सायंकाळी गडहिंग्लज येथील ‘गमक’ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांबळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. घरगुती उपयोगासाठी त्यांना भांडी, साडी-चोळी व शाल या बहिणींनी दिली.
तसेच रोटरी क्लब आॅफ मुंबई, गोरेगाव-वेस्ट येथील बाबू गिरप व पुष्कराज कोल्हे यांच्या वतीने व्हीलचेअर व वॉकर भेट म्हणून दिला. याप्रसंगी पुणे येथील संदीप पाटील, अवधूत पटेकर, सचिन जाधव, धीरज साळोखे, सदानंद पाटील, संतोष कोरे, विकास गायकवाड, आदी उपस्थित होते.
या दोघी बहिणींचे दु:ख हलके करण्यासाठी आम्ही मदत केली आहे. गोरेगाव येथील ‘रोटरी’च्या वतीने व्हीलचेअर व वॉकर भेट दिला आहे. यासह आमच्या संस्थेच्या वतीने या दोघींना शासकीय योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
बाळासाहेब पाटील,
राज्य सचिव,
राष्ट्रीय अपंग विकास महामंडळ