कोल्हापूर : आरोग्यदेवता धन्वंतरीच्या पूजनाने ‘धनत्रयोदशी’ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 04:13 PM2018-11-05T16:13:21+5:302018-11-05T16:19:59+5:30
आरोग्यदेवता धन्वंतरीच्या पूजनाने सोमवारी ‘धनत्रयोदशी’ उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील रुग्णालये, दवाखाने, तसेच औषधांच्या दुकानात सायंकाळी हे पूजन झाले. या दिवशी व्यापारी वार्षिक ताळेबंदाची वही खरेदी करतात.
कोल्हापूर : आरोग्यदेवता धन्वंतरीच्या पूजनाने सोमवारी ‘धनत्रयोदशी’ उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील रुग्णालये, दवाखाने, तसेच औषधांच्या दुकानात हे पूजन झाले. या दिवशी व्यापारी वार्षिक ताळेबंदाची वही खरेदी करतात.
वसूबारसने दिवाळीचे पडघम वाजल्यानंतर सोमवारी धनत्रयोदशी उत्साहात साजरी झाली. आयुर्वेदाची देवता धन्वंतरीचा जन्मदिवस. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, व्यावसायिकांकडून धन्वंतरीचे पूजन केले जाते. यानिमित्त सरकारी-खासगी रुग्णालये, दवाखाने तसेच औषधांच्या दुकानांना फुलांनी सजवण्यात आले होते. सायंकाळी देवतेचे विधीवत पूजन करण्यात आले.
कोल्हापुरात अंबाबाई मंदिराच्या परिसरात धन्वंतरी देवतेचे मंदिर आहे. येथे सोमवारी सकाळी अभिषेक व पूजाविधी संपन्न झाले. दिवसभर नागरिकांनी देवतेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
या शिवाय ‘धनतेरस’ या नावानेही प्रसिद्ध असलेल्या या दिवशी श्री लक्ष्मीची आराधना केली जाते. धन, सुख-समृद्धीची ही देवता असल्याने अनेक कुटुंबांमध्ये धने व श्री लक्ष्मीची मूर्ती ठेवून देवीची पूजा केली जाते. व्यापारी, व्यावसायिक रोजमेळे, ताळेबंदाच्या नवीन वह्या खरेदी करतात.
याच दिवशी यमदीपदानही होते आणि दीपावलीचे दिवे लावण्यास सुरुवात होते. या दिवशी दक्षिणेकडे पणती लावली की घरात कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही अशी श्रद्धा आहे. यालाच ‘यमदीपदान’ असे म्हणतात. त्यामुळे दारादारांत आता मिणमिणत्यांचा प्रकाशोत्सव सुरू झाला आहे.