कोल्हापूर : शाहूवाडी, चंदगड, गगनबावड्यात अतिवृष्टी, धरणातून विसर्ग वाढला : अद्याप २७ बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 05:24 PM2018-07-11T17:24:40+5:302018-07-11T17:30:26+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी शाहूवाडी, चंदगडसह गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांतही जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातील धुवाधार पावसाने विसर्ग वाढला असून, नद्यांची पाणीपातळी चांगलीच फुगली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी शाहूवाडी, चंदगडसह गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांतही जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातील धुवाधार पावसाने विसर्ग वाढला असून, नद्यांची पाणीपातळी चांगलीच फुगली आहे. सात नद्यांवरील २७ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. विशेष करून पश्चिमेकडील तालुक्यात जोरदार पाऊस आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३७.८१ मिलिमीटर पाऊस झाला.
गगनबावडा तालुक्यात ९१ मिलिमीटर, चंदगडमध्ये ७३.५०, तर शाहूवाडी तालुक्यात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजरा, राधानगरी, भुदरगड तालुक्यांतही जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणक्षेत्रात ८०, वेदगंगा ६७, पाटगाव १७०, घटप्रभा १६०, तर कोदे धरणक्षेत्रात १४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
राधानगरीतून प्रतिसेकंद १६००, कडवीमधून १६०, कुंभीमधून ३५०, घटप्रभामधून ३७९३, जांबरे १२४९, तर कोदे धरणातून ६३४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पाणीपातळी चांगलीच फुगली आहे. नद्यांचे पाणी विस्तीर्ण पसरू लागले असून, २७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची पातळी बुधवारी सायंकाळपर्यंत २८ फुटांपर्यंत राहिली.
पडझडीत १.४५ लाखाचे नुकसान
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील कमलाबाई गावडे यांच्या घराच्या दोन, मजरे शिरगाव येथील रत्नाबाई कांबळे व चंदगड येथील दत्तू कांबळे यांच्या घरांच्या भिंती कोसळून १ लाख ४५ हजारांचे नुकसान झाले आहे.
कागलमध्ये ५५ टक्के पाऊस
जिल्ह्याची सरासरी १७७२.३९ मिलिमीटर आहे. आतापर्यंत ५१९.५२ मिलिमीटर (२९.३१ टक्के) पाऊस झाला आहे. पण, कागल तालुक्यात सव्वा महिन्यातच सरासरीच्या ५५ टक्के पाऊस झाला आहे. शाहूवाडीमध्ये ४७ टक्के, भुदरगडमध्ये ४४, तर चंदगडमध्ये ३५ टक्के पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा-
हातकणंगले (३.६३), शिरोळ (३.४२), पन्हाळा (२२.४३), शाहूवाडी (६०.००), राधानगरी (५१.१७), गगनबावडा (९१.००), करवीर (१४.२७), कागल (२४.८५), गडहिंग्लज (१८.७१), भुदरगड (५३.००), आजरा (३७.७५), चंदगड (७३.५०).